उद्धव ठाकरेंच्या मित्रपक्षाचा NCP ला धक्का; चिंचवड पोटनिवडणुकीबाबत पत्ते उघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 05:50 PM2023-02-16T17:50:06+5:302023-02-16T17:50:36+5:30
राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृह नेते आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेने लढवावी आणि कलाटेंनी उमेदवारी द्यावी असा वंचितचा आग्रह होता परंतु तसे घडले नाही असं वंचित बहुजन आघाडीने म्हटलं.
मुंबई - भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा आणि चिंचवड येथे पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. त्यात या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असा प्रयत्न करणाऱ्या भाजपानेही हे दोन्ही मतदारसंघ टिकवण्यासाठी रणनीती आखली आहे. त्यात दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मित्रपक्षाने चिंचवड पोटनिवडणुकीबाबत त्यांचे पत्ते उघड केले आहेत.
नुकतीच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली आहे. मात्र चिंचवडच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केले आहे. वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारणी बैठक पार पडली त्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे त्याठिकाणी अद्याप सोनिया गांधींनी वंचितकडे पाठिंबा द्यावा असं विनंती पत्र पाठवले नाही. त्यामुळे अद्याप या जागेबाबत वंचितने निर्णय घेतला नाही.
परंतु पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांनी माध्यमांना सांगताना हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात खुलासा केलेला आहे त्यामध्ये सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशीर्वाद होता असे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत जाणार नाही असा कुठेही खुलासा केलेला नाही त्यामुळे चिंचवड पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीत २०१९ मध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता आणि त्यांनी १ लाख १२ हजार मते घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृह नेते आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेने लढवावी आणि कलाटेंनी उमेदवारी द्यावी असा वंचितचा आग्रह होता परंतु तसे घडले नाही. पहाटेच्या शपथविधीबाबत झालेल्या गौप्यस्फोटामुळे मविआची परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे भाजपाला चिंचवडमध्ये कोण थांबवू शकले तर राहुल कलाटेच थांबवू शकतात या मताला आली आहे असं सांगत वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले.