संजय राऊत प्रगल्भ नेते नाहीत, तोल गेल्यानं ते काहीही बरळतात; वंचित बहुजन आघाडीचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 04:10 PM2024-08-15T16:10:50+5:302024-08-15T16:11:55+5:30
संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांवर केलेल्या टीकेचा वंचित बहुजन आघाडीने घेतला समाचार
मुंबई - संजय राऊत यांना खऱ्या खोट्याचे भान राहिलेले नाही. वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांना बदनाम करण्यासाठी ते तोल गेल्याप्रमाणे बरळत असतात. राऊतांची भूमिका ही उद्धव ठाकरे, शरद पवारांची आहे का असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधणा आहे.
अकोला येथे राऊतांनी केलेल्या टीकेवर वंचितनं प्रत्युत्तर दिलं आहे. रेखा ठाकूर म्हणाल्या की, संजय राऊतांमुळे अख्खा पक्ष सोडून गेला. महाराष्ट्रात राऊतांना कुणी प्रगल्भ राजकारणी मानत नाही. संजय राऊतांनी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पण राऊत जी भूमिका मांडतायेत ती उद्धव ठाकरे, शरद पवारांची आणि महाविकास आघाडीची समजायची का? ज्या वंचित बहुजन आघाडीला सुरुवातीच्या बैठकीतही बोलावलं नाही त्यांना आम्ही ७ जागा देऊ केल्या अशी थाप राऊतांनी मारली असा आरोप त्यांनी केला.
संजय राऊत यांना खऱ्या खोट्याच भान राहिले नाही
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) August 15, 2024
वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांना
बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाने ते बरळत आहे.
रेखाताई ठाकुर
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी#VBAforIndiapic.twitter.com/1KwGizACah
तसेच ज्या लोकांना देशद्रोही, धर्मांध म्हणत आहात त्यांना वाढवण्याचं पाप तुमचेच आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या गोध्रा हत्याकांडात नरेंद्र मोदींना पाठिशी घालण्याचं काम त्यांनीच केले हे ते विसरले का?. महाराष्ट्रात संविधानाची आन देऊन त्यांनी मते घेतली. आता याच संविधानातील आरक्षणाच्या प्रश्नावर ते बोलत नाही. ओबीसींचे आरक्षण धोक्यात आलेले असताना शिवसेना, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. महाराष्ट्रातील जनतेला हे लोक किती प्रामाणिक आहेत ते कळू द्या असा टोलाही प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
निष्ठावान शिवसैनिकांसाठी मातेसमान असलेल्या शिवसेना पक्षाला फाेडून गद्दारांची सेना स्थापन करणाऱ्या शिंदे यांच्या सेनेला प्रकाश आंबेडकर खरी शिवसेना मानत असतील तर मागील अनेक वर्षांपासून या राज्यात व देशात बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम रामदास आठवले, प्रा.जाेगेंद्र कवाडे व राजेंद्र गवई करीत आहेत असं म्हटल्यास वावगे ठरु नये. प्रकाश आंबेडकरांची सतत बदलणारी भूमिका पाहता रामदास आठवले, प्रा.कवाडे, गवई हेच बाबासाहेबांच्या विचारधारेचे खरे शिलेदार असल्याचा टाेला शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी लगावला होता.