‘वंचित’ देणार २५ मुस्लिमांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 01:46 PM2019-09-07T13:46:33+5:302019-09-07T14:05:41+5:30

काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत होते...

vanchit given 25 muslim candidates for vidhansabha election | ‘वंचित’ देणार २५ मुस्लिमांना उमेदवारी

‘वंचित’ देणार २५ मुस्लिमांना उमेदवारी

googlenewsNext
ठळक मुद्देवरिष्ठ सूत्रांची माहिती : काँग्रेससोबतच्या आघाडीबाबतही लवकरच निर्णयाची शक्यता  वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत असदुद्दीन ओवेसी यांनी पुढाकार घेऊन चर्चा सुरूजलील यांनी काढलेल्या पत्रकाच्या संदर्भाने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

धनाजी कांबळे - 
पुणे : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ लाख मते घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता हीच वंचित आघाडी विधानसभा निवडणुकीत लहान जातींमधील समूहांना प्रतिनिधित्व देणार असून, सुमारे २५ मुस्लिमांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. मात्र, हे मतदारसंघ कोणते असतील याबाबत मात्र गुप्तता राखण्यात येत आहे. 
काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. मात्र,  लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी एक पत्रक प्रसिद्धीला देऊन एमआयएमची वंचित सोबतची आघाडी तोडत असल्याचे जाहीर केले असताना एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून मात्र तसा कोणताही संदेश किंवा पत्र ‘वंचित’च्या वर्किंग कमिटीकडे किंवा वंचितचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आलेले नाही.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत असदुद्दीन ओवेसी यांनी पुढाकार घेऊन चर्चा सुरू केली होती. त्यामुळे युती कायम ठेवायची, किंवा तोडायची याचा निर्णयदेखील तेच घेतील. त्यामुळे त्यांचा निर्णय येत नाही, तोपर्यंत अजूनही एमआयएम आमच्यासोबतच आहे, असे पत्र वंचितच्या वर्किंग कमिटीने प्रसिद्धीस दिले आहे. 
जलील यांनी काढलेल्या पत्रकाच्या संदर्भाने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेले आहे. मात्र, या सगळ्या घडामोडी घडत असताना वंचितच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत मुस्लिम, ओबीसी, धनगर, गरीब मराठा, आदिवासी अशा लहान समाज घटकांना स्थान देण्यात आले आहे. त्याची पहिली यादी लवकरच जाहीर होणार असून, लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने जातीच्या उल्लेखासह उमेदवार जाहीर केले होते. तोच फॉर्म्युला यावेळी देखील कायम ठेवण्यात आला असून, आतापर्यंत ज्यांना कोणत्याच राजकीय पक्षाने संधी दिली नाही, अशा वंचित घटकांना निवडणुकीच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रतिनिधित्व देण्यावर भर असल्याचेही सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीसोबत युती करण्याच्या चर्चा होत असताना एमआयएम असेल, तर आघाडी होणे शक्य नाही, असे म्हटले जात होते. मात्र, आता जलील यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार एमआयएम बाहेर पडली असेल, तर काँग्रेस आघाडी पुन्हा वंचितसोबत चर्चा करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आघाडीत सामील होते का नाही, याबद्दलही उत्सुकता आहे. 
.......
जलील यांचा बोलवता धनी कोण?


लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना भरघोस मते मिळाली, यात वंचितचादेखील महत्त्वपूर्ण वाटा आहे. मात्र, खासदार म्हणून निवडून आल्यापासून जलील यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत, त्यामुळेच ते एकतर्फी निर्णय जाहीर करीत आहेत, अशी चर्चा आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना विचारून त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे, का स्वत:च निर्णय घेतला आहे, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे जलील यांचा बोलावता धनी कोण? एमआयएम वंचितपासून वेगळी होण्याने कुणाचा फायदा होणार, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
........
 

Web Title: vanchit given 25 muslim candidates for vidhansabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.