वांद्र्यातील प्र्रचाराच्या तोफा थंडावल्या
By Admin | Published: April 10, 2015 04:51 AM2015-04-10T04:51:56+5:302015-04-10T08:42:04+5:30
आरोप-प्रत्यारोप आणि दिग्गज राजकारण्यांच्या सभांनी रंगत भरलेल्या वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक प्रचाराच्या
मुंबई : आरोप-प्रत्यारोप आणि दिग्गज राजकारण्यांच्या सभांनी रंगत भरलेल्या वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावल्या. अखेरच्या दिवशी महायुती व कॉँग्रेसच्या उमेदवारांनी भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले.
बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या शनिवारी (दि. ११) मतदान होत आहे. सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत, कॉँग्रेसचे नारायण राणे व एमआयएमचे रहबर खान या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होत आहे.
उघड प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून जोरदार प्रचार केला. तृप्ती सावंत यांच्या प्रचारासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला. सकाळी साडे दहाच्या सुमारास मातोश्री परिसरातून रॅलीला सुरुवात झाली. त्यांच्यासमवेत राज्यमंत्री रवींद्र वायकर, सेनेचे सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते. रॅलीत आजी-माजी विभागप्रमुख, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते. कलानगर, वांद्रे वसाहत, गव्हर्नमेंट कॉलनी, चेतना कॉलेज मार्गे खेतवाडीतील शाखेजवळ दुपारी २च्या सुमारास रोड शोची सांगता झाली. भगवे झेंडे, टोप्या, मफलरी, भगव्या साड्यांतील महिला कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार राणे यांच्या समर्थकांत मुंबईतील सर्व प्रमुख कॉँग्रेस नेत्यांनी यात्रा काढली. खेतनगरातील पक्षाच्या मुख्य कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. मुंबई कॉँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, प्रदेश सहप्रभारी सोयराज वाल्मीकी, बाला बच्चन, प्रिया दत्त, आमदार कालिदास कोळंबकर, अस्लम शेख, नसीम खान, माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह, माजी मंत्री सचिन अहिर, बलदेव खोसा, अशोक जाधव आदी सहभागी होते. त्यामध्ये सुरुवातीला माजी खासदार नीलेश राणेंसह अन्य युवक कार्यकर्ते मोटारसायकल घेऊन सहभागी झाले होते. मतदारसंघातील प्रमुख मार्गावरून फिरून ३ वाजण्याच्या सुमारास रॅलीची सांगता झाली. त्यानंतर सायंकाळी संजय निरुपम यांनी प्रचारसभा घेत प्रचाराची सांगता केली. एमआयएमच्या उमेदवार रहबर खान यांच्या प्रचारासाठी पक्षाचे आमदार वारिस पठाण, अध्यक्ष महंमद पठणी यांनी भारतनगर, बहेराम पाड्यात सभा घेतल्या. (प्रतिनिधी)