विलेपार्ल्यातील ‘पारले’ कारखाना इतिहासजमा
By admin | Published: July 28, 2016 03:18 AM2016-07-28T03:18:54+5:302016-07-28T03:18:54+5:30
चर्चगेटहून विलेपार्लेला जाताना ‘पारले-जी’च्या बिस्किटांच्या सुवासावरून विलेपार्ले स्थानक आल्याचे प्रवाशांना समजायचे. अनेक जण ट्रेनमधून प्रवास करताना नवख्या मुंबईकराला
मुंबई : चर्चगेटहून विलेपार्लेला जाताना ‘पारले-जी’च्या बिस्किटांच्या सुवासावरून विलेपार्ले स्थानक आल्याचे प्रवाशांना समजायचे. अनेक जण ट्रेनमधून प्रवास करताना नवख्या मुंबईकराला आवर्जून ‘पारले-जी’ बिस्कीट कारखाना दाखवायचे. पण यापुढे हे सर्व इतिहासजमा होणार आहे. कारण, हा कारखाना बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. विलेपार्ले येथील कारखान्यातील उत्पादन क्षमता कमी झाल्यामुळे कारखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
पारले कंपनीची एकूण उलाढाल ही दहा हजार कोटींच्या घरात आहे. देशभरात विविध ठिकाणी पारलेचे उत्पादन केले जाते. विलेपार्ले येथील कारखाना १९२९ साली सुरू करण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात या कारखान्यात फक्त कॅण्डीचे उत्पादन केले जायचे. १९३९ नंतर या कारखान्यात बिस्किट बनवण्यास सुरुवात केली होती. ‘पारले-जी’ या बिस्किटांना इतकी वर्षे उलटूनही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
विलेपार्ल्याच्या कारखान्यातील उत्पादन घटले होते. अशा स्थितीत हा कारखाना सुरू ठेवणे व्यावसायिकदृष्ट्या शहाणपणाचे नाही. त्यामुळे येथील उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्यात शेवटपर्यंत असलेल्या ३०० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे पारले उत्पादनांचे कार्यकारी संचालक अरूप चौहान यांनी सांगितले.
मुंबईत विविध ठिकाणांची ओळख तिथल्या वास्तूंमुळे आहे. जुन्या मुंबईच्या आठवणींना उजाळा देताना या वास्तूंचा उल्लेख नक्कीच केला जातो. त्याचप्रमाणे विलेपार्लेची एक ओळख म्हणून गेल्या ७७ वर्षांपासून ‘पारले-जी’चा कारखाना उभा होता. याच्या आसपासच्या परिसरातून जाताना बिस्किटाच्या सुवासाने अनेकांची मने मोहून जात. वाढत्या शहरीकरणामुळे मुंबईच्या जुन्या खुणा पुसल्या जात आहेत.
हा कारखाना बंद झाल्यावरही मुंबईतील एका वास्तूची खूण पुसट होणार आहे. पारलेचा कारखाना बंद होणार ही बातमी पार्ल्यात पसरल्यानंतर पार्लेकरांनी खेद व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
३00 कर्मचाऱ्यांनी स्वीकारली स्वेच्छानिवृत्ती
- विलेपार्ल्याच्या कारखान्यातील उत्पादन घटले होते. अशा स्थितीत हा कारखाना सुरू ठेवणे व्यावसायिकदृष्ट्या शहाणपणाचे नाही. त्यामुळे येथील उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
- कारखान्यात शेवटपर्यंत असलेल्या ३०० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे पारले उत्पादनांचे कार्यकारी संचालक अरूप चौहान यांनी सांगितले.