विधवांना अनुदान वाटपात तफावत
By admin | Published: October 31, 2016 04:31 AM2016-10-31T04:31:58+5:302016-10-31T04:31:58+5:30
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेतून विधवांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत तफावत आहे.
अकोला : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेतून विधवांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत तफावत आहे. मे २०१५ पूर्वी अर्ज मंजूर असलेल्या विधवांना प्रतिमहा नऊशे, तर त्यानंतरच्या पात्र विधवांना सहाशे रुपये अनुदान दिले जात आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणताच याबाबत शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात येत आहे, असे तहसीलदारांनी सांगितले. तसे पत्र बुधवारी सामाजिक न्याय विभागाला पाठविण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या संजय गांधी निराधार योजनेतून विधवा, दिव्यांग, तृतीयपंथी व परित्यक्तांना लाभ दिला जातो. दरमहा ६०० रुपये अनुदानही निश्चित आहे; मात्र एका कुटुंबात एकापेक्षा अधिक लाभार्थी असल्यास त्यांना केवळ ९०० रुपये देण्याची अट शासनाने २६ आॅक्टोबर २०१० रोजीच्या शासन निर्णयात टाकली. त्यातून दोन लाभार्थी असल्यास त्यांचे प्रतिव्यक्ती मिळून होणाऱ्या १२०० रुपयांपैकी ३०० रुपयांची आधीच कपात करण्यात आली. त्यातही कर्त्या पुरुषाचा मृत्यू झालेल्या कुटुंबातील फक्त विधवेलाच पात्र ठरविण्यात आले आहे. त्या कुटुंबातील पाल्य योजनेसाठी लाभार्थीच नाहीत. त्यामुळे एका विधवेला प्रतिमाह ६०० रुपयेच देण्याचे आदेशात नमूद आहे. हा प्रकार आत्महत्याग्रस्त असलेल्या जिल्ह्यातील विधवांसाठी अन्याय्य ठरत आहे.विशेष म्हणजे, शासनाच्या आदेशाचा अर्थ लावताना नव्याने लाभार्थी म्हणून निवड झालेल्या विधवांनाच तो लागू करण्यात आला. (प्रतिनिधी)
यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात येत आहे. त्यानंतरच या तफावतीबाबत निर्णय घेतला जाईल.
- निर्भय जैन, तहसीलदार, अकोला.