कुजबुज!..त्यामुळे भाजपाला मनसेशिवाय पर्याय नाही; सदिच्छा भेटीमागचं गुपित काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 06:39 AM2024-02-11T06:39:13+5:302024-02-11T06:39:52+5:30
खा. श्रीकांत शिंदे यांचा पराभव सामान्य शिवसैनिक करेल, असे सांगून आदित्य ठाकरेंनी त्यांच्या उमेदवारी चर्चेला पूर्णविराम दिल्याचे मानले जाते.
...तर मनसेला पर्याय नाही
लोकसभा निवडणुका येऊ घातल्याने राजकारणात उलथापालथी व्हायला सुरुवात झाली आहे. मनसेच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने भाजप - मनसे युतीची चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेकदा फडणवीसांना भेटले आहेत. त्यामुळे आता मनसे नेत्यांच्या भेटीत गुपित काय, या चर्चेवर नेत्यांनी सदिच्छा भेट असे स्पष्टीकरण दिले. सध्याची परिस्थिती पाहता निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका राज यांनी घ्यावी, अशी चर्चा आहे. पण, उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याविरोधात सर्व पक्ष एकवटल्याचे वातावरण भाजपलाच निर्माण करायचे असेल तर मनसेला पर्याय उरणार नाही, अशी कुजबुज आहे.
बांबू कुठे कुठे लागतात?
ठाण्यातील नमो सेंट्रल पार्कचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी भाषणात ठाण्यात बांबूची लागवड करा, अशी सूचना शिंदे यांनी केली. भाषणाच्या ओघात ‘बांबू कधी कधी व कुठे कुठे लागतात’, असे विधान मुख्यमंत्र्यांनी करताच श्रोत्यांमध्ये हंशा पिकला. गेले काही दिवस दोन शिवसेनेमध्ये सुरू असलेला संघर्ष व महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार यांच्याकडील पक्षाचे नाव व चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल या ताज्या घडामोडींचा संदर्भ श्रोत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाशी जोडला. काही वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्षाची भूमिका मान्य केली नाही, तर शिवाजी पार्कमध्ये बरेच बांबू आहेत, असे विधान केले होते.
अजिंक्य तारा कोण?
कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जमिनीच्या वादातून हिललाईन पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे नुकतेच कल्याणमध्ये आले होते. यावेळी कल्याणमध्ये ‘अजिंक्य तारा चमकणार’ असे फलक लावले होते. कल्याण लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदित्य यांच्या नावाची चर्चा सुरू होती. हा प्रश्न ठाकरे यांना विचारला असता त्यांनी खा. श्रीकांत शिंदे यांचा पराभव सामान्य शिवसैनिक करेल, असे सांगून त्यांच्या उमेदवारी चर्चेला पूर्णविराम दिल्याचे मानले जाते.