Varsha Gaikwad on SSC Exam: पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास शाळेची मान्यता रद्द होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 05:23 PM2022-03-16T17:23:41+5:302022-03-16T17:37:43+5:30
Varsha Gaikwad on SSC Exam : दोन वर्षांनंतर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होत आहेत, पण यात अनेक ठिकाणी गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पेपर फुटीप्रकरणी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई: सध्या राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू आहे. दोन वर्षांनंतर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा सुरू आहेत, पण यात अनेक ठिकाणी गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पेपर फुटीप्रकरणी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ''कोणत्याही शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाईल'', अशी घोषणाच वर्षा गायकवाड यांची विधान परिषदेत केली आहे.
...तर शाळेची मान्यता रद्द होणार
वर्षा गायकवाड म्हणाल्या, ''नगर जिल्ह्यातील ज्या शाळेत पेपर फोडल्याचे प्रकरण समोर आले होते. त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. पण, यापुढे इतर कुठल्याही शाळेत पेपरफुटीचे प्रकरण समोर आले, तर त्या शाळांची मान्यतादेखील काढून घेण्यात येईल. तसेच एखाद्या शाळेत कॉपीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांना यापुढे परीक्षा केंद्रही दिले जाणार नाहीत,'' अशी माहिती त्यांनी दिली.
सदर प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इथे हे सांगू इच्छिते, की असा गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 16, 2022
परीक्षेसंदर्भात गैरसमज न पसरवण्याचे आवाहन
''दहावीचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत, त्यामुळे परीक्षेसंदर्भात गैरसमज पसरू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच, शाळा तिथे परीक्षा केंद्र दिल्याने राज्यात या वेळी दहावीच्या परीक्षेला मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्र वाढलेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त अधिक देण्याची विनंती आम्ही केलेली आहे. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यासाठीची माहिती घेऊन परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत'', असे देखील वर्षा गायकवाड सभागृहात म्हणाल्या.
विद्यार्थ्यांसाठी खास सूचना
परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी एक तास आगोदर हजर राहणे गरजेचे असेल. सकाळी 10.30चा पेपर असल्यास 9:30 वाजता तर दुपारी तीन वाजता पेपर असल्यास दोनला पोहोचावे लागेल. परीक्षेला उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करुनच परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे. विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे उशिरा आल्यास त्याच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याची सर्व तपासणी करुन सकाळच्या सत्रात साडेदहा पर्यंत तर दुपारच्या सत्रामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल.