पावसाच्या तडाख्याने वसई जलमय
By Admin | Published: August 2, 2016 03:10 AM2016-08-02T03:10:52+5:302016-08-02T03:10:52+5:30
गेले दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने वसईला झोडपून काढले.
वसई : गेले दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने वसईला झोडपून काढले. विरार, नालासोपारा, नवघरसह वसईच पश्चिमपट्यातील अनेक गावांमध्ये पाणी साचले होते.
शनिवारपासून पावसाने वसईत जोरदार हजेरी लावली आहे. सतत कोसळत असलेल पावसाने काल रात्रीपासून वसईत अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. नेहमीप्रमाणे नालासोपारा शहर जलम झाले होते. सेेंट्रल पार्क रस्त्यासह रेल्वे उड्डाण पूलाच्या दोन्ही बाजूला पाणी साचल्याने वाहतूकीवर परिणाम होत आहे.
समुद्राला मोठे उधाण आल्याने किनारपट्टीवरील अनेक गावांना त्याचा फटका बसला. नाळा-वाळुंजे रस्ता पाण्याखाली गेल्याने नानभाट येथील शाळा बंद ठेवण्यात आली होती. नाळा तलाव भरून वाहू लागल्याने रस्त्यावर पाणी जमा झाले होते. सत्पाळे-राजोडी रस्ता पाण्याखाली गेल्याने येथील कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि गावकऱ्यांचे हाल झाले.
मुसळधार पावसाने नालासोपारा शहराला पुन्हा एकदा मोठा फटका दिला. रेल्वे उड्डाणपूलाच्या दुतर्फा पाणी आणि सेेंट्रल पार्क रस्त्यावर साचून राहिल्याने वाहतूक कोंडी होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. नालासोपारा पश्चिमेकडील रस्ताही पाण्याखाली गेला होता. त्यामुळे एका एटीएम सेंटरमध्ये पाणी शिरले होते. विरार पश्चिमेकडील विराटनगरात पाणी तुंबून राहिले होते.
वसई रोड ते गोखीवर या मुख्य रस्त्यावर एव्हरशाईन सिटी दरम्यान प्रचंड पाणी तुंबून राहिल्याने वाहतूक कोलमडून पडली होती. या रस्त्यापलिकडे असलेल्या मीठागर पाड्याला पाण्याने वेढा दिल्याने येथील लोकांचा पुन्हा संपर्क तुटला होता. तर सनसिटी रस्ता काल रात्रीपासून पुन्हा पाण्याखाली गेल्याने यामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
पावसाच्या तडाख्याने शनिवारपासून मुंबई-अहमदाबाद हायवेवर काठीयावाड ढाबा परिसरात पाणी तुंबून राहिले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या मार्गावरील वाहतूक ठाणे-भिवंडी मार्गे वळवण्यात आली आहे. मात्र हा मार्ग अतिशय दुरवरचा आणि प्रचंड वेळ खाणारा असल्याने वाहने हावेवरून ये-जा करीत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पाणी वाहुन जाण्यासाठी अद्याप कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने वाहनांचा खोळंबा होऊन वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे एरव्ही रेती वाहतूक करणारे ट्रक आणि जड वाहनांकडून वसूली करण्यासाठी नाक्यानाक्यावर असलेले ट्रॅफिक पोलीस गायब झाले होते. कोंडी सोडवण्यासाठी पोलीस हायवेवर तैनात करण्यात आले नसल्याने संताप व्यक्त झाला. (प्रतिनिधी)
>तानसाने धोक्याची पातळी ओलांडली; प्रशासन सज्ज
वसई/पारोळ : वसई पूर्व भागाला तानसा नदीने धोक्याची पातळी ओलदल्याने काठावरील गावांना अतिदक्षते चा इशारा देण्यात आला आहे सायवन, शिरवली, पारोळ, उसगाव, चांदीप, कोपर, खानिवडे, नवसई, हेदवडे, चिमने, इ या गावाना इशारा देण्यात आला आहे आपत कालीन परिस्थिती निर्माण झाली तर प्रशासन सज्ज झाले आहे.
>वसई पूर्व भागात १५ गावांचा संपर्क तुटला : वसई पूर्व भागात दोन दिवसापासून पावसाने जोरदार तडाखा दिल्याने तानसा धोक्याची पातळी ओलाडल्याने भाताणे, शिरावली, मेढे पुल दोन दिवसापासून पाण्याखाली असल्यामुळे १५ गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच शेकडो हेक्टर भातपीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्गामधे चिंतेचे वातावरण आहे. फोटो:०५ पारोळ भाताणे पूल.