Vasant More: वसंत मोरे मुंबईला जाण्याच्या तयारीत? मातोश्रीचे बोलावणे, पण शिवतीर्थकडून निरोप नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 01:59 PM2022-04-08T13:59:03+5:302022-04-08T14:20:48+5:30
Vasant More on Uddhav Thackray Call: वसंत मोरे हे पक्ष बदलणार की मनसेतच राहणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत गेले तर ते असे दुसरे मनसेचे नेते असतील.
गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांना राज्याचे राजकारण दणाणून सोडले आहे. मशिदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंनी घेतलेल्या भुमिकेविरोधात भूमिका घेतल्याने मोरे यांची काल मनसेने हकालपट्टी केली. त्यांच्याजागी बाबर यांना मनसेचे पुणे शहर अध्यक्ष बनविण्यात आले. आता वसंत मोरे यांना राष्ट्रवादी, शिवसेनेकडून ऑफर येऊ लागल्या आहेत.
वसंत मोरे यांच्याकडे मनसेचा फायरब्रँड म्हणून पाहिले जात होते. पुण्यात अधिकारी, मुजोरी करणाऱ्या लोकांना मनसे स्टाईलने धडा शिकविण्यामुळे वसंत मोरे खूप प्रसिद्ध होते. अशा या फायरब्रँड नेत्याला आपल्याकडे वळविण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी फोन केल्याचे वृत्त आहे. आता वसंत मोरे हे पक्ष बदलणार की मनसेतच राहणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील मोरेंना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मोरेंना मुंबईत भेटायला या, असा थेट निरोप धाडला आहे. दुसरीकडे मोरेंनी राज ठाकरेंची भेट मागितली आहे. परंतू राज यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे वसंत मोरे मुंबईला जाणार का?, पण कोणाकडे मातोश्रीवर की शिवतीर्वथवर अशी चर्चा रंगली आहे. मोरेंना अद्याप तरी मनसे सोडणार असल्याचे वक्तव्य केलेले नाही.
उद्धव ठाकरेंच्या फोनबाबत मोरे यांनी एका वृत्तवाहिनीकडे खुलासा केला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांचा मला फोन आला होता. त्यावेळी मी कात्रजमध्ये नव्हतो. उद्धव ठाकरेंचा फोन असल्याचे ते म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांनी मला भेटायला या म्हणून मला निरोप दिला आहे. इतर नेत्यांचेही फोन आले आहेत, असे ते म्हणाले.
मनसेचा दुसरा फायरब्रँड नेता...
मुंबईतील नितीन नांदगावकर देखील मनसेचे फायरब्रँड होते. त्यांच्यासारखेच काम वसंत मोरेंचे पुण्यात होते. नांदगावकर बहुतांशवेळी उत्तर भारतीयांविरोधात, मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायदा हातात घ्यायचे. अखेर नांदगावकर यांना शिवसेनेने फोडले. आता पुण्यातील मनसेचे वसंत मोरे शिवसेनेच्या वाटेवर गेले तर मनसेसाठी हा मोठा धक्का ठरणार आहे.