वसंत मोरे मनसे टू उद्धवसेनेत व्हाया वंचित बहुजन आघाडी?; उद्धव ठाकरेंना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 11:48 AM2024-07-04T11:48:10+5:302024-07-04T11:48:41+5:30

वसंत मोरे वंचितची साथ सोडून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

Vasant More MNS to Uddhav Sena Vanchit Bahujan Aghadi?; Will meet Uddhav Thackeray | वसंत मोरे मनसे टू उद्धवसेनेत व्हाया वंचित बहुजन आघाडी?; उद्धव ठाकरेंना भेटणार

वसंत मोरे मनसे टू उद्धवसेनेत व्हाया वंचित बहुजन आघाडी?; उद्धव ठाकरेंना भेटणार

पुणे - लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले वसंत मोरे हे पुन्हा एकदा पक्षांतर करणार आहेत. मनसेतून राजीनामा देत बाहेर पडलेल्या वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यानंतर पुणे लोकसभा निवडणूक लढवली आणि आता पुन्हा वसंत मोरे वंचितची साथ सोडून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं बोललं जातंय. 

वसंत मोरे हे मनसेत असल्यापासून कायम चर्चेत राहिले आहेत. अनेकदा पक्षात राहून मोरे यांनी पक्षातील स्थानिक नेत्यांवर टीकास्त्र सोडलं होतं. राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलनाला वसंत मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांची तातडीने पुणे मनसे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. मोरे यांना पदावरून हटवल्यापासून ते मनसेला रामराम करतील अशी चर्चा होती. 

त्यातच वसंत मोरे यांनी कुठल्याही परिस्थिती लोकसभा निवडणूक लढवणार असा चंग बांधला. मनसेची लोकसभेची भूमिका पाहता मोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा वसंत मोरे यांना होती. मात्र मविआकडून काँग्रेसच्या वाट्याला ही जागा होती. याठिकाणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे इच्छुक होते. तरीही वसंत मोरे यांनी मविआच्या विविध नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीत वसंत मोरे यांनी ठाकरेंचे विश्वासू संजय राऊत यांचीही भेट घेतली. मात्र लोकसभा निवडणुकीत मविआकडून वसंत मोरे यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. 

दरम्यान, लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असणारे वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीत गेले. त्याठिकाणाहून त्यांनी पुण्याची निवडणूक लढवली. मात्र वसंत मोरे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. आपण वंचितची साथ सोडणार नाही असं निकालानंतर वसंत मोरे बोलत होते. मात्र आता मोरे यांच्या उद्धव ठाकरे भेटीमुळे ते लवकरच उद्धव सेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. वसंत मोरे हे हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवू इच्छितात. त्यामुळे मोरे यांची उद्धव ठाकरेंसोबत भेट महत्त्वाची मानली जाते. 

Web Title: Vasant More MNS to Uddhav Sena Vanchit Bahujan Aghadi?; Will meet Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.