“महाराष्ट्रातील पहिला मनसेचा खासदार १०० टक्के मीच असेन, पण...”; वसंत मोरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 12:32 PM2023-09-03T12:32:57+5:302023-09-03T12:36:23+5:30

MNS Vasant More: आमदार नाही, आता खासदार व्हायचे आहे, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

vasant more said if party give chance then i will be the 100 percent first mp of mns from pune | “महाराष्ट्रातील पहिला मनसेचा खासदार १०० टक्के मीच असेन, पण...”; वसंत मोरे स्पष्टच बोलले

“महाराष्ट्रातील पहिला मनसेचा खासदार १०० टक्के मीच असेन, पण...”; वसंत मोरे स्पष्टच बोलले

googlenewsNext

MNS Vasant More: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष बांधणीवर भर देताना पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राजपुत्र अमित ठाकरे राज्यातील विविध ठिकाणी दौरे करताना दिसत आहेत. आता मात्र मनसेचे पुढे लक्ष्य बारामती असल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे लवकरच बारातमी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातच आता मनसे नेते वसंत मोरे यांनी मोठे विधान केले आहे. 

मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नाराज होते. वसंत मोरे मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा  होती. मनसे सोडणार नाही, असे वसंत मोरे यांनी अनेकदा बोलून दाखवले. यातच आता वसंत मोरे यांना बारामती लोकसभा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मीडियाशी बोलताना वसंत मोरे यांनी मोठे विधान केले आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

महाराष्ट्रातील पहिला मनसेचा खासदार १०० टक्के मीच असेन

मनसे कार्यकर्ते आमदार म्हणून तुमच्याकडे पाहत आहेत, याबाबत वसंत मोरे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. नाही, मला तर यावर्षी खासदार व्हायचे आहे. पुण्याचा खासदार होण्यास मी इच्छुक आहे. मला वाटतं की माझ्या पक्षाने मला संधी दिली, तर यावर्षी महाराष्ट्रातला पहिला मनसेचा खासदार हा वसंत मोरे १०० टक्के असेल, असे मोठे विधान वसंत मोरे यांनी केले. 

बारामती शहरात राज ठाकरे लवकरच मोठा मेळावा घेणार

बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रमुख संघटक म्हणून माझी नियुक्ती झाल्यानंतर, पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातील चारही तालुक्यांना भेटी देत आहे. पुरंदर आणि बारामतीला भेट दिली आहे. आता इंदापूर आणि दौंडला भेट देईन. चारही तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत, त्यांच्या नेमणुका आम्हाला करायच्या आहेत. त्यासाठी ही चाचपणी सुरू आहे. पक्ष संघटना मजबूत करणं, हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात काम सुरू केले आहे, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली. 

दरम्यान, निवडणुकीच्या दृष्टीकोनातून काय पाऊल उचलायचे? हे राज ठाकरे ठरवतील. पण बारामती शहरात लवकरात लवकर आम्ही राज ठाकरेंना आणणार आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा पहिला मेळावा बारामती शहरात होईल, असेही वसंत मोरे यांनी सांगितले. 


 

Web Title: vasant more said if party give chance then i will be the 100 percent first mp of mns from pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.