“२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 09:24 AM2024-04-03T09:24:08+5:302024-04-03T09:24:22+5:30

Vasant More News: एकनिष्ठ राहून न्याय मिळाला नाही. परंतु, प्रकाश आंबेडकरांनी मला न्याय दिला, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

vasant more said prakash ambedkar gave me justice for to contest lok sabha election 2024 from pune | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत

“२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत

Vasant More News: मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की, काही झाले तरी लोकसभा निवडणूक लढवणारच. वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली हे माझे भाग्य समजतो. मात्र, २५ वर्षे ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही, अशी खंत वंचित बहुजन आघाडीचेपुणे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी बोलून दाखवली. 

पुणे लोकसभेत आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपाकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि आता वंचितकडून वसंत मोरे निवडणूक रिंगणात असणार आहेत. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनी लोकसभेचे तिकीट मिळण्यासाठी सुरुवातीला महाविकास आघाडीच्या पायऱ्या झिजवल्या. तेथून पदरी निराशा आल्यानंतर मराठा समाजाकडून पाठिंबा मिळतो का, याची चाचपणी केली. यानंतर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन आपला मनसुबा बोलून दाखवला. अखेर वसंत मोरे यांना यश आले आणि वंचितकडून उमेदवारी मिळाली. 

मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवेन

प्रकाश आंबेडकर यांना एकदाच भेटायला गेलो आणि लगेचच वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेमध्ये असताना मला जी संधी मिळाली, त्याचे सोने करून दाखवले. या संधीचेही सोने करून दाखवेन. आता मला पुणे शहरावर काम करण्याची संधी मिळेल, असे वसंत मोरे यांनी सांगितले. तसेच ज्या पक्षात २५ वर्षे मी एकनिष्ठ राहिलो, तिथे मला न्याय मिळाला नाही. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी मला न्याय दिला. पुण्यातील विकासाचा जो पॅटर्न असेल, तो कात्रज विकासाचा पॅटर्न असेल. माझा वैयक्तिक कोणताच पॅटर्न नसेल. कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन. कारण त्यांच्यामुळे ही संधी मिळाली, असे वसंत मोरे म्हणाले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघात उमेदवार न उतरविण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नांदेडमधून अविनाश भोसीकर, पराभणीतून बाबासाहेब उगले, औरंगाबादमधून अफसर खान, तर शिरूरमधून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत २४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
 

Web Title: vasant more said prakash ambedkar gave me justice for to contest lok sabha election 2024 from pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.