वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा आदेश पाळावा, महायुतीच्या प्रचाराला लागावे; अमित ठाकरेंचा पुण्यातून सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 05:17 PM2024-04-17T17:17:41+5:302024-04-17T17:18:12+5:30
Amit Thackeray on Vasant More: मोदी सरकारला देशात ३०० च्या आसपास जागा मिळतील. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच पाठिंब्याचा निर्णय घेतला असावा. - अमित ठाकरे
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांनी मनसे सोडली होती. मोरे बऱ्याच महिन्यांपासून राज ठाकरेंवर नाराज होते. अखेर ठाकरे लोकसभा लढवत नाहीत याची खात्री होताच मोरे यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी धावाधाव सुरु केली होती. अखेर मोरे यांना वंचितकडून उमेदवारी मिळाली. आता प्रचार सुरु असताना राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी वसंत मोरेंवर टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मोदींसोबत राज यांची सभा आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर अमित ठाकरे आज पुण्यात आले होते. यावेळी अमित यांनी गप्पागप्पांमध्ये राजकीय मुद्द्यांवर टोलेबाजी केली.
वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचे आहे. ते सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा उमेदवारी सोडावी, राज ठाकरेंचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचाराला लागावे, असे ठाकरेंनी म्हटले आहे.
मोदी सरकारला देशात ३०० च्या आसपास जागा मिळतील. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच पाठिंब्याचा निर्णय घेतला असावा. जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करणार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुंबईत उद्धव ठाकरे आणि मविआला एकही जागा मिळणार नाही. त्यांच्या विरोधात वातावरण आहे. तसेच राज आणि नरेंद्र मोदी यांची मुंबईत एकत्र सभा होणार असल्याची माहितीही अमित ठाकरे यांनी दिली.