'मनसे' ला रामराम, 'मविआ'च्या नेत्यांना भेटले; अखेर वसंत मोरेंचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 07:02 PM2024-04-05T19:02:38+5:302024-04-05T22:12:54+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे कुठल्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा पुणेकरांमध्ये होती. त्यात वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यानंतर मोरे यांनी अकोला इथं जाऊन प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली
अकोला - Vasant More in Vanchit Bahujan Aghadi ( Marathi News ) पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचितकडून उमेदवारी जाहीर झालेले वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीत अधिकृतपणे पक्षप्रवेश केला आहे. मोरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत. मनसेतून राजीनामा देऊन वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र मविआकडून उमेदवारीबाबत नकारघंटा मिळाल्याने वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीची वाट धरली.
वसंत मोरे हे मनसेचे फायरब्रँड नेते होते. गेली १५ वर्ष ते पुण्यातील कात्रज भागातून नगरसेवक म्हणून निवडून येतात. त्यांच्यावर मनसेच्या शहराध्यक्षपदाचीही जबाबदारी होती. मात्र मनसेच्या मस्जिदीवरील अनधिकृत भोंगे हटाव मोहिमेला मोरे यांनी उघडपणे विरोध केला. पक्षाचा आदेश जुमानला नाही म्हणून तातडीने वसंत मोरे यांनी मनसेच्या शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतरही वसंत मोरे मनसेत राहिले. वसंत मोरे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राज ठाकरेंनी दिली होती.
परंतु शहर कार्यकारणी आणि वसंत मोरे यांच्यातील वाद विकोपाला पोहचला होता. वसंत मोरे जाहीरपणे मनसे शहर कार्यकारणीविरोधात विधानं करत होते. त्यामुळे वसंत मोरे मनसे सोडतील अशा बातम्या वारंवार सुरू होत्या. त्यातच ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. आपल्याला सर्व पक्षाच्या नेत्यांकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर असल्याचं वसंत मोरे सांगत होते. मनसे सोडताच ते मविआतील प्रमुख तीन पक्षांपैकी एका पक्षात जातील असंही बोललं जात होते.
वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे शरद पवार, अमोल कोल्हे आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर, मोहन जोशी यांची भेट घेतली. पुणे लोकसभा निवडणूक लढवायचीच असा चंग वसंत मोरे यांनी बांधला होता. मात्र मविआच्या सर्व पक्षाकडून मोरे यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वसंत मोरे यांनी नुकतीच प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. या भेटीनंतर पुण्यातून वसंत मोरे यांना तिकीट मिळाले. त्यामुळे आता वसंत मोरेंचा अधिकृतपणे वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश झाला आहे.