वसंतदादा कारखाना मुंबईच्या दत्त इंडियाकडे

By Admin | Published: May 17, 2017 10:03 PM2017-05-17T22:03:08+5:302017-05-17T22:03:08+5:30

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना अखेर मुंबईच्या श्री दत्त इंडिया या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने बुधवारी घेतला

Vasantdada factory in Mumbai's Datta India | वसंतदादा कारखाना मुंबईच्या दत्त इंडियाकडे

वसंतदादा कारखाना मुंबईच्या दत्त इंडियाकडे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 17 : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना अखेर मुंबईच्या श्री दत्त इंडिया या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने बुधवारी घेतला. दाखल झालेल्या तीन निविदांमध्ये सर्वाधिक २६१ रुपये प्रतिटन दराची निविदा दत्त इंडियाने दाखल केली होती. भाडेकरार दराचा हा राज्यातील उच्चांक आहे.
जिल्हा बँकेने ९३ कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी वसंतदादा साखर कारखाना ताब्यात घेतला आहे. कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. दोनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर बुधवारी निविदा दाखल करण्याच्या अंतिम दिवशी वाळव्याचा हुतात्मा सहकारी साखर कारखाना, कोल्हापुरातील व्यंकटेश्वरा आणि मुंबईच्या श्री दत्त इंडिया या कंपनीने निविदा दाखल केली होती. बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालकांच्या बैठकीत निविदा उघडण्यात आल्या. यावेळी निविदाधारकांचे प्रतिनिधी, शेतकरी संंघटना, वसंतदादा कारखाना व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्राधिकृत अधिकारी मानसिंग पाटील यांनी सर्वाधिक दर श्री दत्त इंडियाचा असल्याचे जाहीर केले. त्यानंतर कारखाना त्यांना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला.
करार करताना काही कायदेशीर बाबींची व कागदपत्रांची पूर्तता करून देण्याची मागणी संबंधित कंपनीने केल्यानंतर, जिल्हा बँकेने त्यांची पूर्तता करण्याचे मान्य केले. येत्या दोन दिवसात याबाबतची उर्वरित प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ह्यवसंतदादाह्णच्या डिस्टिलरीसाठी जाहीर केलेल्या निविदेकरिता या तिन्ही कारखान्यांनी स्वतंत्रपणे निविदा दाखल केल्या होत्या. अपसेट प्राईसपेक्षा (किमान दर) तिन्ही निविदा कमी दराच्या होत्या. चार कोटीचा किमान दर असताना सर्वाधिक सव्वा कोटी रुपयांची निविदा हुतात्मा कारखान्याची होती. त्यामुळे डिस्टिलरीचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. डिस्टिलरीसाठी जिल्हा बँक फेरनिविदा काढण्याची शक्यता आहे.
वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर गेल्यामुळे जिल्हा बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. वर्षभरात संबंधित ठेकेदाराकडून ७0 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. ही रक्कम आल्यानंतर बँकेचा एनपीए कमी होणार आहे. बँकेने १७ एप्रिलरोजी वसंतदादा कारखान्याची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानंतर बरोबर एक महिन्याने म्हणजेच १७ मेरोजी निविदा निश्चित झाली. लवकरच दत्त इंडिया कंपनीबरोबर भाडेकरार केला जाणार आहे.

दत्त इंडिया संस्थेची पार्श्वभूमी...
वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर घेणारी मुंबईची दत्त इंडिया ही कंपनी साखर उद्योगातील देशातील आघाडीवरील संस्था आहे. साखरेची मोठी उलाढाल दरवर्षी करताना, बऱ्याच कारखान्यांना आर्थिक मदत करण्याचे कामही या संस्थेने केले आहे. सध्या जितेंद्र धरू हे या संस्थेचे काम पाहत आहेत.

दहा वर्षांचचा भाडेकरार
कंपनीशी दहा वर्षांचा भाडेकरार होणार आहे. भाडेकरार संपताच पुन्हा हा कारखाना सभासदांच्या ताब्यात सुपूर्द केला जाणार आहे. या सर्व गोष्टींचा करारपत्रात उल्लेख केला जाणार आहे. वसंतदादा कारखान्याच्या सभेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता करून करारपत्र केले जाणार आहे.

राजारामबापूने प्रयत्न थांबविले
वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वाने घेण्यासाठी राजारामबापू कारखानाही प्रयत्नशील होता. मात्र कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी बँकेकडे ड्यू डिलिजन्स रिपोर्ट (योग्य अध्यव्यवसाय अहवाल) मागितला. या अहवालानुसार नेमकी किती देणी आहेत, हे स्पष्ट होत असते. कारखान्याची ही मागणी योग्य होती. मात्र असा अहवाल मिळण्यास विलंब लागणार होता. या अहवालासाठी पुन्हा फेरनिविदा काढण्याची वेळ बँकेवर आली असती. या सर्व बाबींचा विचार करून राजारामबापू कारखान्याने निविदा प्रक्रियेतून अंग काढून घेतले.

वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वाने चालविण्यासाठी मिळालेला दर अपेक्षेपेक्षा चांगला आहे. त्यामुळे शेतकरी, सभासद, कामगार यांच्यासाठी हा दिलासादायक निर्णय आहे.
- विशाल पाटील, अध्यक्ष, वसंतदादा कारखाना

Web Title: Vasantdada factory in Mumbai's Datta India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.