अफाट आणि बंडखोर व्यक्तिमत्त्वाचे वसंतदादा!
By Admin | Published: November 13, 2016 01:14 AM2016-11-13T01:14:00+5:302016-11-13T01:10:58+5:30
रविवार विशेष
वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपल्या देशातील रयतेच्या कल्याणासाठी स्मरण करायला हवे. विशेषत: महाराष्ट्राच्या वाटचालीला एक विधायक वळण देणारा नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. त्यांचा वारसा विधायक सहकार चळवळीत आहे आणि राजकीय वारसा हा संघर्षाचा आहे. आपण राजकारणाकडेच अधिक पाहतो.
जेष्ठ नेते वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष आज सुरू होत आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व सरळमार्गी, सुस्वभावी,अन्यायाविरुध्द पेटून उठणारे ,बंडखोरी करणारे होते. सामान्य माणसांतून ताकद निर्माण करून अफाट कर्तृत्व गाजविणारेही होते. सोप्या, सुंदर भाषेत सहजपणे संवाद साधणाऱ्या वसंतदादा पाटील यांचे राजकीय जीवन प्रचंड बंडखोरीने भरलेले होते. त्यामुळेच राजकीय संघर्षातून मिळविलेले कोणतेही पद संपूर्ण कालावधीसाठी त्यांनी कधीच सांभाळले नाही. सत्तेची खुर्ची फेकून देवून सातत्याने स्वाभिमानाने जगण्याची बंडखोर वृत्ती त्यांच्या कणाकणात भरलेली होती. सत्तेचा मोह कधीच झाला नाही. जेव्हा सत्ता घेतली आणि संघर्षाची वेळ आली तेव्हा मनापासून संघर्षही केला. अनेक वादही ओढवून घेतले, त्या वादात यशस्वीपणे संघर्षही केला. महाराष्ट्राच्या राजकारणाला गवसणी घालणारे वसंतदादा पाटील यांचे व्यक्तिमत्त्व त्यामुळेच असंख्य वैशिष्ट्यांनी भरलेले आहे. महाराष्ट्राचे राजकारण समजून घेण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने घेतलेल्या प्रत्येक वळणाचा विचार करावा लागतो.
आजन्म शेती आणि शेतकरी यांचे जीवन जगणारे वसंतदादा स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांची स्वतंत्र भारताच्या राष्ट्रवादावर प्रचंड निष्ठा होती. कॉँग्रेस पक्ष नव्हे, तर एक चळवळ म्हणून त्या विचाराने सार्वजनिक जीवन जगत राहिले. कृषी-औद्योगिक समाजरचनेसाठी सहकार चळवळीचे काम अव्याहतपणे करीत राहिले. राजकारणात तर प्रारंभापासून १९५२ ची विधानसभा निवडणूक लढवून सक्रिय राहिले. पण त्यात सत्तेची हाव नव्हती, प्रथम आमदार झाल्यानंतर एकवीस वर्षांनी मंत्रिपद स्वीकारले. मध्यंतराच्या काळात काही वर्षे ते साधे आमदारही नव्हते. सांगलीतून त्यांनी ज्यांना विजयाचा गुलाल लावा, असे आवाहन केले, तर तो उमेदवार विजयी व्हायचा. इतका स्वत:चा दबदबा असताना १९६७ ते १९७७ पर्यंत दहा वर्षे त्यांचे कार्यकर्ते विधानसभेत सांगलीचे प्रतिनिधित्व करीत होते. खासदारपदाचेही असेच होते. शिवाय सांगली जिल्ह्यातून त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणीही विधानसभेत किंवा संसदेत प्रतिनिधित्व करू शकत नव्हते. इतका राजकीय झंझावात निर्माण करणारे वसंतदादा पाटील सत्तेच्या खुर्चीवर मनापासून रमलेच नाहीत. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा पाटबंधारे मंत्री म्हणून समावेश झाला. तत्पूर्वी ते एका मोठ्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. राज्य साखर कारखाना संघाचे अध्यक्षपद भूषविले होते. राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. कॉंग्रेस पक्षात प्रदेश सरचिटणीस होते. प्रांतिक कॉंग्रेसचे अध्यक्षपद सांभाळत कॉंग्रेसची मजबूत ताकद निर्माण केली होती. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे नेतृत्व केले होते. शिवाय असंख्य सहकारी संस्थांचे ते संस्थापक होते. महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापन होण्यापूर्वी याच तत्त्वानुसार औद्योगिकीकरणाचा विस्तार करण्यासाठी सहकारी औद्योगिक वसाहती स्थापन केल्या होत्या. शेंगापासून तेल काढणाऱ्या सहकारी गिरण्या, भातावर प्रक्रिया करणाऱ्या गिरण्या, कापसावर प्रक्रिया करणाऱ्या सूतगिरण्या, सहकारी बँका, अशा अनेक संस्था स्थापन करून सहकार चळवळीचे ते महामेरू झाले होते. शिवाय शिक्षण क्षेत्रातही काम सुरू केले होते. गावापासून काम सुरू करून महाराष्ट्र राज्याची आर्थिक घडी बसविणाऱ्या कृषी औद्योगिक समाजरचनेचा पाया त्यांनी
घालण्यासाठी अखंडपणे काम केले होते. त्यानंतर ते राजसत्तेच्या जवळ गेले. सातत्याने विधायक कामात स्वत:ला गुंतवून घेणारे वसंतदादा पाटील राजकीय सत्तेवर सातत्याने गाजत राहिले.
पाटबंधारे मंत्री असताना अनेक प्रकल्पांची रचना करताना दस्तुरखुद्द मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याशी संघर्षाचा त्यांनी पवित्रा घेतला. त्या संघर्षात दादांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. एक संवेदनशील माणूस त्यांच्यात दडलेला होता. त्यामुळे राजकीय वादळात राहूनही त्यांचे मन कोलमडून पडले आणि देशाच्या राजकारणात एकमेव उदाहरण असेल की, मुख्य प्रवाहातील प्रचंड काम करून राजकीय मतभेदामुळे राजकीय संन्यास घेतला. सलग चार वर्षे ते संन्याशाच्या भूमिकेत होते आणि दुसरे एक वैशिष्ट्य की कॉंग्रेस पक्ष १९७७ मध्ये सत्तेवरून प्रथमच बाजूला फेकला गेला. जनता पक्षाची राजवट आली होती. अनेक कॉंग्रेसजणांनी या प्रवाहात कॉंग्रेसविरोधी राजकारणाच्या प्रवाहात सामील झाले होते. अशा वातावरणात ते कॉंग्रेसच्या मदतीला धावून आले. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर पुन्हा राजकीय काम सुरू केले. मात्र, काँग्रेस नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्याने के. ब्रह्मानंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस पक्षात काम केले. परिणाम असा झाला की, सांगली जिल्ह्यातून इंदिरा कॉंग्रेसचा एकही उमेदवार १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाला नाही. शेजारच्या सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यांतही यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्या प्रवाहाने रेड्डी कॉंग्रेसचाच सर्वत्र विजय झाला होता. जनता पक्षाने ९९ जागा जिंकल्या होत्या, पण त्यांना सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक संख्याबळ जमविता आले नाही. तेव्हा वसंतदादा पाटील यांनी संन्याशी ते मुख्यमंत्री असा प्रवास केला होता. रेड्डी कॉंग्रेस आणि इंदिरा कॉंग्रेस यांचे संयुक्त आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीने वसंतदादांचे सरकार गडगडले. शरद पवार यांच्या बंडखोरीला यशवंतराव चव्हाण यांचा आशीर्वाद असल्याने पवारांबरोबरच चव्हाणसाहेबांशी वसंतदादा पाटील यांचा संघर्ष झाला होता. तो पुढे चार वर्षे चालला. शरद पवार यांच्याबरोबर तो दहा वर्षे (१९८८ पर्यंत) चालू राहिला होता. जनता राजवट कोसळली. तसे कॉंग्रेसला पुन्हा बरे दिवस आले. वसंतदादा परत १९८३ मध्ये मुख्यमंत्रिपदी दिल्लीहून खासदारपद सोडून आले. त्यांच्याच नेतृत्वाखाली १९८५च्या विधानसभा निवडणुका झाल्या. कॉंग्रेस पक्षाने वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या. हा त्यांच्या जीवनातील सर्वोच्च ताकदवान काळ होता. विधानसभेत १८७ जागा जिंकत प्रचंड बहुमताने वसंतदादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आजपर्यंत सहावेळा महाराष्ट्र विधानसभेच्या झाल्या. मात्र राज्यात एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. १९९० ला राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. मात्र बहुमताला चार जागा कमीच पडल्या होत्या. त्यानंतर सलग पाच निवडणुकीतून संयुक्त आघाडी किंवा युतीचे सरकार सत्तेवर येत राहिले आहे. वसंतदादा पाटील यांचा झंझावात आणि राज्यभर व्यापलेले नेतृत्वापुढे कोणत्याही पक्षाचे, नेत्याचे काहीही चालत नव्हते. अशा तळागाळातून काम करून आलेल्या नेतृत्वाला दिल्लीकरांनी नीट वागणूक दिली नाही. कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रभा राव यांची निवड करताना देशातील एका जबाबदार, दमदार आणि वजनदार मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यातून दादांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी
तडक दिल्ली गाठून नाराजी व्यक्त करण्याची संधी मागितली. तीसुद्धा नाकारण्यात आली. तेव्हा एका झटक्यात राजीनामा देवून बाहेर पडले. तत्कालीन विधानसभेत वसंतदादा पाटील यांना मानणारे शंभर आमदार होते. वसंतदादांची कॉंग्रेसवर प्रचंड निष्ठा. त्याच विचाराचे पाईक म्हणून आयुष्यभर काम केले. पण तत्त्वाचा प्रश्न आला तेव्हा सत्ता सोडून संघर्ष करायला मागे-पुढे पाहिले नाही. चारवेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले, पण प्रत्येकवेळी
त्यांना संघर्षच करावा लागला. ते सत्तेचे भोक्ते नव्हते. म्हणूनही बंडखोरीची ताकद त्यांच्यात होती. त्यापूर्वी आणि अलीकडच्या काळातही अनेक
मुख्यमंत्री तडजोड करीत राहिले. वसंतदादांना अशी तडजोड मान्यच नव्हती, असे वाटते. त्यामुळे मनाने सरळ वाटणारा हा शेतकरी नेता अफाट संघर्षाची तयारी नेहमीच करीत असे. त्यांनी केवळ निरोप धाडला तरी उमेदवार पडायचा किंवा जिंकून यायचा. त्यांच्या निरोपातील तपशीलानुसार राजकारण फिरत असे.
सहकारी क्षेत्रात काम आणि पक्ष संघटनेतील योगदान पाहता त्यांना प्रचंड यश आले. मात्र, राजकीय पटलावर सतत संघर्षच करावा लागला. यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील आणि शरद पवार यांच्याशी त्यांचा संघर्ष झाला. यात त्यांची हार कधी झाली नाही. सांगली जिल्ह्याच्या जनतेने त्यांना साथ दिली. १९५२ पासून आमदार असताना आणि सातत्याने निवडून येण्याची क्षमता असताना त्यांना सत्तास्थान सुमारे पाचच वर्षे मिळाले. याचे कारण त्यांना सत्तेची ओढ नव्हती आणि जेव्हा सत्तास्थानाजवळ गेले तेव्हा संघर्ष शिगेला पोहोचला होता. तो त्यांनी धीरोदात्तपणे केला. सत्ता, संपत्ती, घर, बंगला यांना त्यांनी महत्त्व दिले नाही. ती साधने आहेत, ते साध्य नाही. अशीच त्यांची धारणा होती. म्हणून १९६० नंतर साखर कारखान्याची उभारणी केल्यापासून शेडवजा अतिथीगृहातच आयुष्यभर राहिले. साखर जेथे तयार होत होती, तेथून केवळ शंभर मीटरवर ही जागा आहे. सांगली मुक्कामी या अतिथीगृहाला यात्रेचे स्वरूप येत असे. नवा कारखाना काढू इच्छिणाऱ्यांपासून ते सून नांदत नाही आणि म्हैस चोरीला गेली आहे. पोलिस मदत करीत नाही, अशी गाऱ्हाणी घेऊन येणारे शेकडो लोक तासन्तास दादांची भेट घेण्यासाठी उभे राहात.
सहकार चळवळीचे काम तर अद्वितीय होते. सहकारातून औद्योगिकरणाची एकही संधी त्यांनी सोडली नाही. प्रत्येक संस्था उत्तम पद्धतीने चालवून सहकाराचा मजबूत पाया घातला होता. साखर कारखानदारी मजबूत चालण्यासाठी त्यांनी पायाभूत सुविधांची निर्मिती केली. शिवाय उपपदार्थांच्या उत्पादनास त्यांनी प्रोत्साहन दिले. वसंतदादा पाटील यांच्या पुढाकारानेच आज देशात ऊस संशोधनात नामवंत संस्था म्हणून नाव कमावलेली डेक्कन शुगर इस्टिट्यूट उभी राहिली. दादांच्या निधनानंतर त्यांचेच नाव या संस्थेस दिले आहे. आज जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात जगभरातील ऊस संशोधन आणि साखर कारखानदारीपुढील आव्हानांवर विचारमंथन होत आहे. वसंतदादा पाटील यांच्या दूरदृष्टिकोनातून उभी राहिलेल्या या संस्थेची नोंद आता जागतिक पातळीवर घेतली जात आहे. जगभरातील सर्व प्रकारच्या उसाच्या जातीवर या संस्थेत संशोधन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा एक-एक रुपया देणगीतून आणि सरकारच्या सहकार्यातून साखर धंद्यासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी मूलभूत संशोधन करणारी ही संस्था उभी राहिली. वसंतदादा पाटील यांना या कार्याबद्दल जगभरातील ऊस उत्पादकांनी धन्यवाद दिले पाहिजेत. या संस्थेचा विस्तार आणि विकास शरद पवार यांनी केला.
आंबोली येथेही एक ऊसाच्या नव्या जातीच्या संशोधनाचे उपकेंद्र वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने उभे केले आहे. त्या केंद्राच्या प्रवेशद्वारातच वसंतदादा पाटील यांच्या अफाट व्यक्तिमत्त्वाची आणि केवळ सातवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या एका शेतकऱ्याच्या रूपातील तैलचित्र शरद पवार यांनी लावले आहे. वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचा टोकाचा संघर्ष झाला असला तरी साखर उद्योग आणि ऊसकरी शेतकऱ्यांसाठी वसंतदादा पाटील यांनी केलेल्या मूलगामी कार्याचे जाणीवपूर्वक जतन, संवर्धन आणि विस्तार त्यांनी केला आहे. एका व्यवसायाची ती गरज आहे, हे ओळखून पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम करण्याची वृत्तीदेखील दादांच्या व्यक्तिमत्त्वात कायमच होती. त्यामुळेच एका बाजूला विधायक कामाचा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला राजकीय सत्तालालसा नसल्याने तत्त्वनिष्ठ राजकारणाचा संघर्ष त्यांच्या जीवनप्रवासात दिसतो आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आजपासून होत आहे.
या नेत्याने रयतेसाठी केलेल्या कामातून प्रेरणा घेऊन नव्या समाज उभारणीचे काम करायला हवे. त्यांचा राजकीय वारसा संघर्षाचा आहे आणि इतर कामांचा वारसा विधायकतेचा आहे. आपण त्यांना राजकारणी म्हणूनच आपण जास्त पाहतो, त्याच्या पलीकडे पाहणे आणि कृती करणे हेच त्यांचे स्मरण आहे
वसंत भोसले