आॅलिम्पिकवीर घडविणारा वस्ताद पाच बाय सहाच्या खोलीत
By Admin | Published: April 3, 2015 12:08 AM2015-04-03T00:08:28+5:302015-04-03T00:38:46+5:30
गजानन गवळी यांची परवड : मानधनासाठी पंधरा वर्षांपासून धडपड
सचिन भोसले - कोल्हापूर -टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले बंडा पाटील, डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार अशा अनेक कुस्तीगीरांना घडविणारे काळाईमाम तालमीचे ८९ वर्षीय वस्ताद गजानन गवळी यांचे वयोवृद्ध मानधन मिळावे म्हणून गेली पंधरा वर्षे शासनदरबारी हेलपाटे सुरू आहेत. सध्या ते शनिवार पेठ येथील लोणार गल्लीतील पाच बाय सहाच्या खोलीत जीवन कंठत आहेत. आर्थिक पाठबळ नसल्याने व शासनाच्या दुर्लक्षामुळे कुस्तीसाठी हयात घालविणाऱ्या वस्ताद गवळी यांची वृद्धपणी परवड सुरू आहे. चाळीस वर्षांहून अधिक काळ काळाईमाम तालीम येथे अनेक कुस्तीगीर घडविण्याचे काम गजानन गवळी यांनी केले. ते एकोणनव्वद वर्षांचे असून, सध्या ते पाच बाय सहाच्या खोलीत राहत आहेत. शासनाने आपल्याला वयोवृद्ध मानधन सुरू करावे म्हणून ते शासनदरबारी फेऱ्या मारीत आहेत. प्रत्येकवेळी काही ना काही कारण काढून त्यांचा प्रस्ताव फेटाळला जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी घडविलेल्या कुस्तीगीरांना मात्र वयोवृद्ध कुस्तीगीरांचे मानधन सुरू झाले आहे. ते आजही सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत व दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत काळाईमाम तालीम येथे येऊन बसतात. वृद्धापकाळात शासनाकडून मानधन मिळाले तर बरे होईल, ही आशा ठेवून त्यांनी ‘लोकमत’ ला आपली व्यथा सांगितली. आताच्या शासनकर्त्यांनी तरी माझ्या कार्याची दखल घेऊन मला मानधन सुरू करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
गवळी वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले मल्ल
१९६४ चे टोकिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे बंडा पाटील (रेठरे), खासदार व हिंदकेसरी मारुती माने, डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण माने, सादिक पंजाबी, बिल्ला पंजाबी, विष्णू माने, नारायण माने, रामा माने, केशव पाटील-भेडसगावकर, रंगा कळंत्रे, शिवाजी बडस्कर, बाजीराव कळंत्रे, शिवा चौधरी, नामदेव पांडेकर, विश्वास नलवडे, मानसिंग जगताप, पांडुरंग सावर्डेकर, मल्लू माळी, अहमद पैलवान, कलाप्पा शिराळे.
मी श्रीपती चव्हाण, महादेव हंडे, इब्राहिम पटेल, गणपती बिरंजे, रामचंद्र लोणारी, लक्ष्मण गवळी, म्हामूलाल वस्ताद अशा दिग्गजांकडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून कुस्तीचे धडे घेतले. आॅलिम्पिकसह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर तयार केले आहेत. यापूर्वी मी शिवछत्रपती पुरस्कारासाठीही प्रस्ताव दिला होता. पुरस्कार राहू दे; निदान मला माझा चरितार्थ चालविण्यासाठी मानधन तरी शासनाने द्यावे.
- गजानन गवळी,
ज्येष्ठ कुस्ती मार्गदर्शक