वस्तिशाळा शिक्षक पेन्शनपासून वंचित

By Admin | Published: August 10, 2015 01:17 AM2015-08-10T01:17:12+5:302015-08-10T01:17:12+5:30

आदिवासी पाडे आणि तांड्यांवरील वस्तिशाळांवर काम करणाऱ्या निमशिक्षक आणि कायम सेवेतील शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे

Vastishala teacher deprived of pension | वस्तिशाळा शिक्षक पेन्शनपासून वंचित

वस्तिशाळा शिक्षक पेन्शनपासून वंचित

googlenewsNext

मुंबई : आदिवासी पाडे आणि तांड्यांवरील वस्तिशाळांवर काम करणाऱ्या निमशिक्षक आणि कायम सेवेतील शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. शासनाने वस्ती पातळीवर काम करणाऱ्या शिक्षकांना निमयित केले असले, तरी त्यांच्या समस्या कायम असल्याचे निवेदन शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना दिले आहे.
नियमित केलेल्या शिक्षकांच्या पेन्शनचा प्रमुख प्रश्न अद्याप सुटला नसल्याची माहिती मोते यांनी दिली. ते म्हणाले, नियमित शिक्षकांतील अनेक शिक्षकांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळालेले नाहीत. तरी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याची मागणी त्यांनी केली.
राज्यात वस्तिशाळा योजना सुरू करताना सुमारे ८ हजार वस्तिशाळा शिक्षक आदिवासी भागात स्वयंसेवी शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांची सेवा लक्षात घेऊन १ मार्च २०१४ रोजी शासनाने सर्व शिक्षकांना पद उपलब्धतेनुसार नियमित शिक्षक म्हणून सेवेत घेतले. त्यांतील काही शिक्षक वयोमानामुळे सेवानिवृत्त झाले; तर बरेच शिक्षक सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत. मात्र निवृत्त झाल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची सेवानिवृत्ती मिळत नसल्याची खंत शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी व्यक्त केली.
बोरनारे यांनी सांगितले, नियमित सेवेआधी शिक्षकांनी वस्तीपातळीवर स्वयंसेवी आणि नंतर निमशिक्षक म्हणून काम केले आहे. गेल्या १५ वर्षांपासून ग्रामीण भागापासून आदिवासी पाडे आणि डोंगराळ भागात साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यात या शिक्षकांचे मोलाची योगदान आहे. परिणामी, त्यांच्या सेवेचा योग्य मोबदला देण्यासाठी स्वयंसेवी आणि निमशिक्षक काळातील सेवा ग्राह्य धरून निवृत्तीनंतर शिक्षकांना पूर्ण सेवानिवृत्तीचा लाभ देण्याची मागणी बोरनारे यांनी केली आहे.

Web Title: Vastishala teacher deprived of pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.