‘सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची...’; ठसकेबाज आवाज अन् लावणीची नजाकत हरपली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 09:18 AM2022-12-11T09:18:56+5:302022-12-11T09:19:16+5:30
बालपणी वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेल्या ‘सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची...’ या लावणीने सुलोचना यांना लावणीची गोडी लावली.
सुलोचना चव्हाण यांना लावणीची सेवा केल्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९६५ मध्ये महाराष्ट्र सरकारचा ’मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनाकरिता पुरस्कार, २००९ मध्ये शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार, चिंचवडच्या रोटरी क्लबतर्फे जीवनगौरव पुरस्कार, संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारही त्यांना बहाल करण्यात आला.
अर्थ समजून लावणी गाण्याची कला
मुंबईत जन्मलेल्या सुलोचना यांचे पूर्वीचे नाव सुलोचना महादेव कदम होते. राधाबाई हे त्यांच्या आईचे नाव.
बालपणी वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेल्या ‘सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची...’ या लावणीने सुलोचना यांना लावणीची गोडी लावली.
मराठी माध्यमातून चौथीपर्यंत शिकलेल्या सुलोचना यांना वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी श्यामसुंदर पाठक व भट्टाचार्य या संगीतकारद्वयींनी ‘कृष्ण सुदामा’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी गायन क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले.
उपजतच गायनाची नैसर्गिक देणगी लाभलेल्या सुलोचना यांनी कोणाकडूनही गायनाचे शिक्षण घेतले नव्हते. शब्द, सूर आणि ताल यांचा अचूक संगम घडवत त्यांनी गायलेल्या गाण्यांच्या माध्यमातून रसिकांवर मोहिनी घातली.
संगीताची आवड असणाऱ्या कोल्हापूरमधील श्यामराव चव्हाण यांच्याशी विसाव्या वर्षी त्यांची लग्नगाठ बांधली गेली. शब्दांचे अर्थ समजून लावणी गाण्याची कला सुलोचना यांनी पतिदेव श्यामरावांकडून आत्मसात केली
होती.
त्यामुळे त्या पतिदेवांनाच गुरुस्थानी मानायच्या. जगदीश खेबूडकर यांनी ‘रंगल्या रात्री’ या चित्रपटासाठी लिहिलेली व वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची...’ ही लावणी सुलोचना यांनी गायली. इथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली आणि पुढे आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘लावणी सम्राज्ञी’ ही पदवी बहाल केली.
सुलोचना यांनी ही पदवी मोठ्या अदबीने सांभाळल्याने रसिकांमध्येही त्या लावणी सम्राज्ञी म्हणूनच लोकप्रिय झाल्या. या लावणीनंतर एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या गाऊन त्यांनी संगीतप्रेमींचे मनोरंजन केले.
सुलोचना यांची गाजलेली गाणी
मला हो म्हणत्यात लवंगी मिरची,
सोळावं वरीस धोक्याचं,
पाडाला पिकलाय आंबा,
तुझ्या उसाला लागंल कोल्हा,
कळीदार कपुरी पान,
कोवळं छान,
खेळताना रंग बाई होळीचा,
कसं काय पाटील बरं हाय का,
स्वर्गाहून प्रिय आम्हाला आमचा सुंदर भारत देश,
गाव हे हाय टग्याचं,
मल्हारी देव मल्हारी,
नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी,
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा,
गोरा चंद्र डागला,
मला म्हणत्यात पुण्याची मैना,
पावना पुण्याचा आलाय गं,
पाखरू पिरतीचं लाजून बसलंय उरी,
काय करू तुझ्यावर माझा जीव जडला,
दर रात सुखाची नवसाची,
हिरीला इंजीन बसवा,
कुठवर पाहू वाट सख्याची,
औंदा लगीन करायचं,
अगं कारभारनी, करतो मनधरनी,
करी दिवसाची रात माझी,
तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं,
जागी हो जानकी,
बाई मी मुलखाची लाजरी,
राजसा घ्या गोविंद विडा,
लई लई लबाड दिसतोय गं,
घ्यावा नुसताच बघून मुखडा,
बाळा माझ्या कर अंगाई,
श्रीहरी गीत तुझे गाते.