जी-२० परिषद: प्रकाश आंबेडकरांचे PM मोदींना ५ प्रश्न; म्हणाले, “स्वतःला विश्वगुरुचे लेबल...”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 01:36 PM2023-09-09T13:36:20+5:302023-09-09T13:40:56+5:30
G20 Summit: जी-२० शिखर परिषदेत चीन, रशिया सहभागी झाले नाहीत. यावर बोट ठेवत प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींना थेट प्रश्न विचारले आहेत.
G20 Summit: देशात जी-२० शिखर परिषद सुरू आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या संमेलनाचे आयोजन होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेत सर्व देशांच्या प्रमुखांचे स्वागत केले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी देशाची ओळख ‘इंडिया’ अशी न करता ‘भारत’ अशी करुन दिली. मात्र, यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ प्रश्न विचारले आहेत.
‘एक्स’वर प्रकाश आंबेडकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या ट्विटमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन जी-२० शिखर परिषदेला भारतात न येण्याबाबत काही प्रश्न विचारत हल्लाबोल केला आहे. पोस्टच्या सुरुवातीला कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू. स्वतःला विश्वगुरूचे लेबल चिकटवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझे काही प्रश्न आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींना ५ प्रश्न
- इंडोनेशियामध्ये झालेल्या आशियान शिखर संमेलनात भाषण करताना नरेंद्र मोदींनी कितीदा चीनचा उल्लेख केला?
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिल्लीतल्या जी-२० परिषदेकडे पाठ का फिरवली आहे, हे मोदी सांगू शकतील का?
- रशिया आणि चीनला मान्य व्हावे म्हणून युक्रेन युद्धावरच्या परिच्छेदात भारताने सुचवलेले बदल अमेरिका, इंग्लंड, युरोपियन युनियन आणि इतर पाश्चिमात्य देशांनी धुडकावून लावले आहेत हे खरे आहे का?
- वर्षभराच्या अध्यक्षीय काळात चीन आणि रशियाचा विरोध पाहता युक्रेन युद्धाचा साधा उल्लेख असणारे किती संयुक्त निवेदने किंवा सर्वानुमते दस्तावेज निघाले?
- दिल्लीतल्या संमेलनात कोणत्याच नेत्यांची घोषणा न होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे का? ज्यांच्या अध्यक्षतेखाली नेत्यांची घोषणा जाहीर होऊ शकला नाही, असा पहिला देश बनण्याची नामुष्की भारतावर ओढवणार आहे का? आणि यामुळे संपूर्ण जगात भारताची नाचक्की होणार नाही का? असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी केले आहेत.