“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 04:46 PM2024-09-30T16:46:31+5:302024-09-30T16:48:10+5:30
VBA Prakash Ambedkar News: आरक्षण कायमचे संपले पाहिजे या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप हे चारही पक्ष एक आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
VBA Prakash Ambedkar News: एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपांवरून बैठकांचे, चर्चांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्रितपणे परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी करत सक्षम पर्याय देण्यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. यातच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापताना पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढवली जाईल, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी, महायुती आणि तिसऱ्या आघाडीच्या जागावाटपावर चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने मात्र ११ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन पाठिंबा घेणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता ओबीसी आरक्षणाला समर्थन दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी संविधानाला धरून नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. यातच आता आरक्षण संपवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
विधानसभा निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल
ओबीसींचे आरक्षण हे ओबीसींनाच राहिले पाहिजे. त्यामध्ये इतर कोणाचाही समावेश होता कामा नये. ही वंचित आघाडीची भूमिका आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर वेगळे आरक्षण द्यावे. राज्यात आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून यावरच विधानसभेची निवडणूक लढली जाईल. आरक्षण कायमचे संपले पाहिजे या मुद्द्यावर पडद्यामागे हालचाली सुरू असून, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप हे चारही पक्ष एक आहेत, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
दरम्यान, आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी कायम लढा देईल. रस्त्यावर उतरून आरक्षण वाचवण्याचे धोरण आणणार आहे. या निवडणुकांमध्ये होणारे ध्रुवीकरण हे सामाजिक दृष्टिकोनातून होणार आहे. या निवडणुकांमध्ये आरक्षणावरून ध्रुवीकरण होणार आहे. ज्यांना आरक्षण मिळते ते एका बाजूला ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आरक्षण संपले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. ओबीसी फॅक्टर आरक्षण वाचले पाहिजे, याचे नेतृत्व करणार व मराठा आरक्षण विरोधी नेतृत्व करणार, असे ते म्हणाले.