“मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, अमेरिकेतून आल्यापासून शेअर मार्केट कोसळले”: प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:17 IST2025-02-20T16:14:26+5:302025-02-20T16:17:17+5:30
Prakash Ambedkar News: विरोधी पक्षांना लकवा मारल्याची टीका करत, महाकुंभमेळ्यात एक हजार लोक मृत्युमुखी पडल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

“मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, अमेरिकेतून आल्यापासून शेअर मार्केट कोसळले”: प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar News: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन्ही राजांनी इतिहास निर्माण केला तो प्रेरणादायी आहे. पण त्यात अडकून राहण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घेत आपण नवा इतिहास निर्माण केला पाहिजे. ही मनस्थिती मराठा समाज केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली म्हणून भाजपावाले दंगा करीत आहेत. पण श्रद्धांजलीची पहिली पोस्ट खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच टाकली होती. राहुल गांधी यांनी ती कॉपी केली असावी, अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
गेल्या काही दिवासांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात. पण पंतप्रधान अमेरिकेला जाऊन आल्यापासून ते आजपर्यंत शेअर मार्केट पूर्णपणे कोसळत आहे. दुसरीकडे अमेरिकन डॉलर महाग होत चालला आहे. शासनाकडे येणारा जीएसटीचा ओघ कमी होत चालला आहे. अर्थव्यवस्थेवर हे मोठे संकट आहे. विरोधी पक्षाने दुर्दैवाने या घसरत चाललेल्या आर्थिक परिस्थितीवर मौन पाळलेले दिसत आहे. अमेरिका आणि अदानी यांचे काय होईल ते होईल पण याचा बागलबुलवा म्हणून वापर केला जात आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
महाकुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरीत १ हजार लोक गेलेत
महाकुंभमेळावा हा लोकांचा भावनिक, वैयक्तिक प्रश्न आहे. या महाकुंभ मेळाव्याची उत्तर प्रदेश सरकारने सोय केली. पण ज्या पद्धतीने कुंभमेळ्याचे मार्केटिग चाललेले आहे, त्याचा निषेध आहे. या महाकुंभमेळ्यात १ हजारांहून अधिक लोक चेंगराचेंगरीत गेले, हे दुर्दैवी आहे. शासनाने फक्त ३८ लोकांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. हिंदू संघटनाना आवाहन आहे की, या लोकांचे अंत्यविधी कसे केले हे जाहीर करावे. या सगळ्या घटना पाहता धर्माचे राजकारण हे देशाला आता धोक्याच्या घटकेपर्यत पोचवत आहे. विरोधी पक्षाने याची चर्चा केली पाहिजे. विरोधी पक्ष लकवा मारलेल्या परिस्थितीत गेला आहे. त्यातून त्यांनी स्वतःला सावरत दुरुस्त करावे आणि हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहानंतर ७६ लाख मतदान झाल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. हे संशयास्पद आहे. त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. १८ मार्चरोजी सुनावणी होईल. त्यावेळी आयोगाने न्यायालयात खरे सांगावे यासाठी लोकांनी नैतिक दबाव आणला पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.