जरांगेंसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; आक्रमक टीका करणाऱ्या भुजबळांना तिखट सवाल, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 07:11 PM2023-11-17T19:11:15+5:302023-11-17T19:21:41+5:30
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते आमने-सामने आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या वादात उडी घेतली आहे.
अकोला -जालना जिल्ह्यातील अंबड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यावरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "अंबडमधील मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मनोज जरागेंना राजकीय आव्हान देण्याची काय गरज होती? आरक्षणावरून भांडून काय सिद्ध होणार आहे?" असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांवर निशाणा साधला.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता राज्यातील ओबीसी नेतेही एकवटले आहेत. आज अंबड येथे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात एल्गार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात भुजबळांनी आक्रमक भाषण करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर शेलक्या शब्दांत टीकास्त्र सोडलं. "ओबीसींच्या तुटपुंज्या आरक्षणात आता वाटेकरी तयार केले जात आहे. पण आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आमच्या वाट्याला याल तर याद राखा," असं भुजबळ यांनी म्हटलं होतं. छगन भुजबळ यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
वंचित बहुजन आघाडीने अकोल्यातील ओबीसी नेते आणि ओबीसी समाजाशी धोरणात्मक संवाद बैठक आयोजित केली होती. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार? आपल्याला राज्यातच एकत्र रहायचं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो," अशी भावना आंबेडकर यांनी व्यक्त केली.
प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
राज्यातील आरक्षण प्रश्नावरून छगन भुजबळ यांना लक्ष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील मोदी सरकारचाही समाचार घेतला. "या सरकारचं लोकांना 'कंगाल' करण्याचं धोरण आहे. सामाजिक लढ्याबरोबर ज्यांच्यामध्ये आपण जागृकता निर्माण केली आहे त्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही हे आपण पाहिलं पाहिजे. इथली अर्थव्यवस्था नव्याने उभी केली पाहिजे. ती सर्वसामान्यांच्या आणि शासनाच्या हातात राहायला हवी, याची जबाबदारी आपण उचलली पाहिजे. २०२४ ची निवडणूक आपण जर व्यवस्थित पार पाडली, तर नव्या परिवर्तनाची सुरुवात होईल," असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला.
संभाजीराजेही छगन भुजबळांवर भडकले!
छगन भुजबळ यांनी ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांना डिवचल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. "छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजाला कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप ते करत आहेत.सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे, अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी," अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी 'एक्स'वर दिली आहे.