“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 05:04 PM2024-05-06T17:04:31+5:302024-05-06T17:05:27+5:30
Prakash Ambedkar News: आपल्या शेजारचे देश भारताला आव्हाने देत आहेत. जागतिक स्तरावरील अनेक देश भारतापासून अंतर ठेवत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Prakash Ambedkar News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीतील नेते भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत आहेत. तर भाजपा विरोधकांच्या टीकेचा समाचार घेत आहे. यातच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आता भारताच्या परराष्ट्र धोरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मालदीवसोबत वैयक्तिक प्रॉब्लेम झाल्याने यांनी आर्थिक मदत बंद केली आहे. मालदीव विरोधात कारवाई केली जात आहे. सरकार यावर काहीच बोलल नाही. मालदीव आपल्या सुरक्षचेच्या दृष्टीने महत्त्वाचे बेट आहे. अफगाणिस्तान आता तालिबान चालवत आहे. बांगलादेश सोबतचे आपले संबंध बिघडत चालले आहेत. बाजूचा केवळ भूतान आपल्यासोबत असून, इतर सगळ्या देशांशी संबंध बिघडले आहेत, हे लक्षात येत आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
आपण एकटे पडले आहोत हा खूप मोठा धोका आहे
जर्मनी, फ्रांस हे देश आपल्यापासून अंतर ठेवत आहेत. हे सरकार २०२४ मध्ये जर निवडून आले तर इतर देश कायदा करतील. इतर देशातील किती लोक आपल्या देशात राहणार, याचा सगळ्यात जास्त फटका आपल्या भारताला बसणार आहे. आपले शेजारी देश आपल्याला सोडून गेले आहेत. आपण एकटे पडले आहोत हा खूप मोठा धोका आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, निर्मला सीतारामन या मोदींच्या व्हॉईस आहेत तर त्यांचे पती देशाचा व्हॉइस आहेत. मणिपूरमध्ये जे घडलं त्यावर आपले लोक गंभीर विचार करत नाहीत हे दुर्दैव आहे. चीन आपल्या देशात घुसत आहे. राजनाथ सिंह म्हणतात की, पीओकेमधील लोक भारतात यायला तयार आहेत. हे खोटे आहे. देशाच्या सुरक्षेला धोका आहे. नेपाळ आपल्या देशाला आव्हान देत आहे. त्यांच्या नोटावर आपला असणारा भाग त्यांनी त्यांचा भाग दाखवला आहे. उत्तराखंड माधला हा सगळा भाग आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.