Bypoll Election 2023: कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 07:21 PM2023-02-05T19:21:28+5:302023-02-05T19:22:38+5:30
Bypoll Election 2023: निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये. लोकशाहीत ही संकल्पनाच नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Bypoll Election 2023: संपूर्ण राज्याचे लक्ष पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, अलीकडेच शिवसेना ठाकरे गटाशी युती केलेल्या वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा कोणाला मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे.
मीडियाशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमची शिवसेनेची युती आहे. आम्ही शिवसेनेला विनंती केली होती की, त्यांनी या दोन्ही जागा लढवाव्या. कारण कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीने इथे उमेदवारच जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. मात्र, शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर नक्कीच आमचे समर्थन असेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
लोकशाहीत बिनविरोधी ही संकल्पनाच नाही
तसेच लोकशाहीत बिनविरोधी ही संकल्पनाच नाही. एखाद्या आमदाराचे निधन झाले, तर त्यांच्याबद्दल सहानुभूती असेल, याबाबत दुमत नाही. मात्र, येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये. ही संकल्पना लोकशाहीत बसत नाही. त्यामुळे लोकांना नवीन लोकप्रतिनिधी निवडू द्यावे, या मताचा मी आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, या भाजपच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"