“छत्रपती शिवरायांचा अपमान केला, RSS अन् भाजपाने माफी मागावी”; प्रकाश आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 08:53 PM2024-09-02T20:53:40+5:302024-09-02T20:54:22+5:30

VBA Prakash Ambedkar News: १६ व्या शतकात असलेले शल्य हे आता २०२४ ला RSS स्वतःच्या विचारांमध्ये कॅरी करत आहे. याचा निषेध करतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

vba prakash ambedkar said bjp and rss should apologized over dcm devendra fadnavis statement on shivaji maharaj | “छत्रपती शिवरायांचा अपमान केला, RSS अन् भाजपाने माफी मागावी”; प्रकाश आंबेडकरांची टीका

“छत्रपती शिवरायांचा अपमान केला, RSS अन् भाजपाने माफी मागावी”; प्रकाश आंबेडकरांची टीका

VBA Prakash Ambedkar News: आठ महिन्यांपूर्वीच सांगितले होते. काँग्रेसने जर तेव्हा आम्हाला सोबत घेतले असते, तर लोकसभा निवडणुकीत भाजपाला २२० वरती जाऊ दिले नसते. गरिबांना बरोबर घ्यायचे नाही, यासाठी काँग्रेसवाल्यांनी स्वतःची पंतप्रधानपदाची खुर्ची सुद्धा सोडायला तयार आहेत, हे मी लोकांना समजावून सांगत होतो. निर्णय न घेणाऱ्या लोकांना सत्ता देऊ नका, असे सांगत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

मीडियाशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार ते लवकरच सांगेन. आमचा ओबीसींबरोबर समझोता झाला आहे. जिल्हा-जिल्ह्यातील ओबीसी संघटनांबरोबर समन्वय समित्या स्थापन झालेल्या आहेत. प्रचार समित्या स्थापन झालेल्या आहेत. महाराष्ट्रभरातील आदिवासींची एकजूट आम्ही बांधतोय. लवकरच त्याबाबत घोषणा केली जाईल. एकंदरीत आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत, असे तुम्ही समजा, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

शिवाजी महाराजांनी ब्राह्मणशाहीला आणि मनुस्मृतीला आव्हान उभे केले

देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दुर्दैव असे म्हणेन की, एका कर्तबगार व्यक्तिमत्त्वाचा इतिहास नाकारण्याचा भाग होत आहे. त्याचे एकमेव कारण असे आहे की, त्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणशाहीला आणि मनुस्मृतीला आव्हान उभे केले. अलुतेदार, बलुतेदार यांचे सैन्य उभे केले. एक राज्य उभे केले. याचे १६ व्या शतकात असलेले शल्य हे आता २०२४ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःच्या विचारांमध्ये कॅरी करत आहे. याचा निषेध करतो. या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांनी जो शिवाजी महाराजांचा अपमान केला, तो मोठा अपमान आहे. त्याबाबत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.  ते माफी मागणार नाही, याची खात्री असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भाजपाचे लोक खूप भित्रे आहेत. दोन दिवस थांबा त्यांची मोठी पोल खोलणार आहे. असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला. मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की,  मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे. शरद पवार सांगायला तयार नाहीत की, माझा त्याला पाठिंबा आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना सांगतो की, तुम्ही जात म्हणून मतदान केले, तर या देशाला धोका आहे हे लक्षात ठेवा. जात बघून मतदान करणार असाल तर तुम्ही या देशाचे सर्वात मोठे विरोधक आहात हे लक्षात ठेवा, असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटले.

 

Web Title: vba prakash ambedkar said bjp and rss should apologized over dcm devendra fadnavis statement on shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.