“...तर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग शक्य”; अजितदादांचे नाव घेत प्रकाश आंबेडकरांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 05:09 PM2024-07-20T17:09:35+5:302024-07-20T17:11:02+5:30
Prakash Ambedkar News: राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीपर्यंत आरक्षणाचा मुद्दा झुलवत ठेवायचा आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
Prakash Ambedkar News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये थेट लढत असली, तरी राज्यात तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. तिसऱ्या आघाडीचा प्रयोग प्रत्यक्षात येणार का, तिसरी आघाडी झाली तरी त्यात कोण कोण असेल आणि निवडणुकीत कसा परिणाम दिसू शकेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचेप्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीबाबत सूचक विधान केले आहे.
पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी अनेकविध मुद्द्यांवर भाष्य केले. ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून तेढ निर्माण झाली आहे ही खरी गोष्ट आहे. शेवटी आरक्षण कुणाला द्यायचे आणि कुणाला द्यायचे नाही, हे सरकारच्या हातात आहे. दंगली करून काय साध्य करणार? त्यातून काही साध्य होणार नाही. दंगल करूच नका. दोघांनी बसून सरकारच्या विरोधात लढा. आपापसात कशाला लढता, मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिले की, सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करा. राजकीय पक्ष आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. या राजकीय पक्षांना आरक्षणाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीपर्यंत झुलवत ठेवायचे आहे. मतदारांना माझे असे आवाहन राहील की, त्यांनी आपल्याला झुलवत ठेवले तर आपणही त्यांना झुलवत ठेवायला हवे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
...तर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग शक्य
अजित पवार हे जोपर्यंत भाजपसोबत आहेत, तोपर्यंत तिसरी आघाडी शक्य नाही. अजित पवार जर महायुतीतून बाहेर पडले तरच तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केल्याचे सांगितले जात आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांनी आता निवडणुकीच्या तयारीला लागायला हवे, आपल्या घोषणेची पूर्तता त्यांनी केली पाहिजे, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शरद पवार आणि राज्य सरकार २ महिन्यांचे आहे. मनोज जरांगे यांची मागणी आहे की, मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून द्या. यावर आपली आणि शरद पवार यांची काय भूमिका आहे? ती स्पष्ट करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने एक्सवर एक पोस्ट करत केले आहे.