“आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे”; प्रकाश आंबेडकरांचे शरद पवारांना पत्र, दिले निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 05:05 PM2024-07-23T17:05:43+5:302024-07-23T17:08:50+5:30

VBA Prakash Ambedkar Letter To NCP Sharad Pawar: आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना केले आहे.

vba prakash ambedkar write letter to sharad pawar for inviting to take part in arakshan bachao andolan | “आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे”; प्रकाश आंबेडकरांचे शरद पवारांना पत्र, दिले निमंत्रण

“आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे”; प्रकाश आंबेडकरांचे शरद पवारांना पत्र, दिले निमंत्रण

VBA Prakash Ambedkar Letter To NCP Sharad Pawar: ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी व्हावी, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे ओबीसी आंदोलनाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. यातच शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना एक पत्र लिहून आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. 

प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलै रोजी चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. यानंतर आता आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना केले आहे.

आरक्षण बचाव यात्रेत सहभाग घ्या

आरक्षण बचाव यात्रा काढणार आहे. महाराष्ट्रातील विविध शहरे, गावे आणि गावांमधून ही यात्रा जाणार आहे. इतर मागास जाती (ओबीसी), अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांच्या प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी ही यात्रा सुरू करण्यात येत आहे. ओबीसी आरक्षण वाचवणे; एससी, एसटी आणि ओबीसींसाठी पदोन्नतीमध्ये आरक्षण; एससी/एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करणे; ओबीसी विद्यार्थ्यांना समान शिष्यवृत्तीचा विस्तार; ५५ लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करणे, या मुद्द्यांवर या यात्रेत भर देण्यात येणार आहे. २५ जुलै रोजी चैत्यभूमी, मुंबई येथून ‘बचाव यात्रा’ सुरू होईल आणि त्याच दिवशी महात्मा फुले वाडा, पुणे येथे जाईल. मी तुम्हाला २६ जुलै २०२४ रोजी किंवा यात्रेदरम्यान कोणत्याही वेळी कोल्हापुरात माझ्यासोबत येण्यासाठी आमंत्रित करतो. तुम्ही या यात्रेत सामील व्हाल, अशी अपेक्षा आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान, ही यात्रा मुंबई येथून २५ जुलै रोजी निघणार असून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना आणि औरंगाबाद येथे यात्रेचा समारोप होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांचे निमंत्रण स्वीकारून छगन भुजबळ, शरद पवार यांच्यासह अन्य नेते या यात्रेत सहभाग घेणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 
 

Web Title: vba prakash ambedkar write letter to sharad pawar for inviting to take part in arakshan bachao andolan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.