व्हीसीए पदाधिका-यांवर अखेर गुन्हा दाखल
By admin | Published: January 31, 2017 09:12 PM2017-01-31T21:12:15+5:302017-01-31T21:12:15+5:30
भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामना घेणा-या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) पदाधिका-यांवर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 31 - सुरक्षेसंदर्भातील अनेक महत्वपूर्ण बाबी दुर्लक्षित करून भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामना घेणा-या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) पदाधिका-यांवर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये व्हीसीएच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवाचाही समावेश आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, व्हीसीएने सुरक्षेसंदर्भातील बाबी दुर्लक्षित करून जामठ्यात विनापरवानगीने आंतरराष्ट्रीय सामना घेतल्याचे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात ठळकपणे प्रकाशित करून खळबळ उडवून दिली होती. तसेच व्हीसीए पदाधिका-यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही व्यक्त केली होती, हे येथे विशेष उल्लेखनीय.
व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर रविवारी रात्री टी-२० चा आंतराष्टीय सामना पार पडला. हा सामना बघण्यासाठी देशविदेशातील हजारो क्रिकेट रसिक येणार असल्याचा अंदाज असल्याने सुरक्षासंबंधाने पोलिसांनी व्हीसीए पदाधिका-यांना अनेक महत्वपूर्ण सूचना केल्या होत्या. प्रेक्षक हजारो वाहने आणतील त्यामुळे अपघात होऊ नये, कल्लोळ वाढू नये, कुणाला कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून खास काळजी घेण्याचीही सूचना पोलिसांनी केली होती. मात्र, व्हीसीए पदाधिका-यांनी त्याकडे पुरते दुर्लक्ष केले. व्हीसीएने सुरक्षेचे अनेक मुद्दे वाऱ्यावर सोडतानाच पोलिसांच्या सूचनाही धुडकावल्याने पोलिसांनी या सामन्याची परवानगी रद्द करीत असल्याचे लेखी पत्र व्हीसीए पदाधिका-यांना दिले. एवढेच नव्हे तर रविवारी सकाळी सामना सुरू होण्याच्या काही तासाअगोदर पोलिसांनी व्हीसीए पदाधिका-यांसोबत घेतलेल्या बैठकीत नियमाचे उल्लंघन झाल्यास कायदेशिर कारवाई केली जाईल, असा ईशाराही दिला होता. मात्र, व्हीसीए पदाधिका-यांनी त्याला दाद दिली नाही. त्यामुळे व्हीसीए पदाधिका-यांवर कोणत्या स्वरूपाची कारवाई करावी, यासंबंधाने वरिष्ठ पातळीवर गंभीर स्वरूपाची चर्चा सुरू होती.
उपसरपंचाने केली तक्रार
दरम्यान, सामन्याच्या दिवशी डीजेचा कर्णकर्कश आवाज, गोंगाट, मोठ्या संख्येतील वाहनांच्या हॉर्नमुळे जामठा भागातील वृद्ध आणि आजारी नागरिक, विद्यार्थी यांना प्रचंड त्रास झाला. त्यामुळे व्हीसीए पदाधिका-यांविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज सोमवारी जामठा येथील उपसरपंच कवडूजी ढेंगे (वय ४५) यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात दिला. या तक्रार अर्जाच्या संबंधाने वरिष्ठ पातळीवर प्रदीर्घ विचारमंथन झाल्यानंतर मंगळवारी दुपारी हिंगणा पोलिसांनी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम १५ (१) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना आरोपींमध्ये व्हीसीएचे अध्यक्ष अॅड. आनंद जयस्वाल, उपाध्यक्ष प्रशांत वैद्य, सचिव भूपेंद्रसिंग भट्टी, सुरक्षा संबंधिची जबाबदारी सांभाळणारे आनंद देशपांडे आणि संचालक मंडळातील आणखी काही पदाधिकारी यांचा समावेश केला. या संबंधाचे वृत्त बाहेर आल्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली.
अशी आहे शिक्षेची तरतूद
पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६ कलम १५ उपकलम (१) मध्ये ५ वर्षांपर्यंत कारावास किंवा १ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचे उल्लंघन सुरूच राहिल्यास प्रत्येक दिवसामागे ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.