मोठी घोषणा! वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात; देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 05:38 AM2022-09-15T05:38:33+5:302022-09-15T05:39:26+5:30
काही महिन्यांपूर्वी आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळे हा प्रकल्प गुजरातला घेण्याचा निर्णय घेतला. पण जुलैमध्ये महाराष्ट्राच्या नेतृत्वासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी स्पर्धात्मक ऑफरसह इतर राज्यांना मागे टाकण्याचा प्रचंड प्रयत्न केला.
मुंबई - वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटलं आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील १ लाख नोकऱ्या बुडाल्या असा आरोप विरोधकांकडून करत सत्ताधाऱ्यांची कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु याच आरोप-प्रत्यारोपात वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांताचे आभार मानत विरोधकांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले अनिल अग्रवाल?
वेदांता-फॉक्सकॉन बहु-अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसाठी व्यावसायिकरित्या साइटचे मूल्यांकन करत आहे. ही एक वैज्ञानिक आणि आर्थिक प्रक्रिया आहे ज्याला अनेक वर्षे लागतात. आम्ही याची सुरुवात सुमारे २ वर्षांपूर्वी केली होती. आमचा उद्देश साध्य करण्यासाठी आमच्या अंतर्गत आणि बाह्य व्यावसायिक एजन्सीच्या टीमने काही राज्ये उदा. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू इ. गेल्या २ वर्षांपासून आम्ही या प्रत्येक सरकारशी तसेच केंद्र सरकारशी चर्चा करत आहोत आणि आम्हाला त्यांचा चांगला पाठिंबा मिळाला आहे.
This multibillion dollar long-term investment will change the course of Indian electronics. We will create a pan-India ecosystem & are fully committed to investing in Maharashtra as well. Maharashtra will be our key to forward integration in our Gujarat JV. (4/4)
— Anil Agarwal (@AnilAgarwal_Ved) September 14, 2022
काही महिन्यांपूर्वी आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळे हा प्रकल्प गुजरातला घेण्याचा निर्णय घेतला. पण जुलैमध्ये महाराष्ट्राच्या नेतृत्वासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी स्पर्धात्मक ऑफरसह इतर राज्यांना मागे टाकण्याचा प्रचंड प्रयत्न केला. परंतु आम्हाला एकाच ठिकाणी सुरुवात करायची आहे असल्यानं व्यावसायिक आणि स्वतंत्र सल्ल्यानुसार आम्ही गुजरातची निवड केली. ही अब्जावधी डॉलरची दीर्घकालीन गुंतवणूक भारतीय इलेक्ट्रॉनिक्सची दिशा बदलेल. आम्ही संपूर्ण भारतात इकोसिस्टम तयार करू आणि महाराष्ट्रातही गुंतवणूक करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आमच्या गुजरात JV मध्ये एकीकरण पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र आमची गुरुकिल्ली असेल असं सांगत त्यांनी वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याचे स्पष्ट म्हटलं.
देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
कंपनीच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितले की, वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी अनिल अग्रवाल यांचे मनःपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू. https://t.co/2X0oGP2ujX— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2022
मात्र मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत. महाराष्ट्रात ३.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? हा माझा या नेत्यांना प्रश्न आहे. स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर असं सांगत फडणवीसांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला.
माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला?
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2022
स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर !