Foxconn Vedanta Deal: "एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्याची किंमत गुजरातने वेदांत-फॉक्सकॉनच्या रूपाने वसूल केली"; राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 06:03 PM2022-09-14T18:03:01+5:302022-09-14T18:04:36+5:30
"मुख्यमंत्री शिंदे गुजरातसमोर लाचार, महाराष्ट्रात 'वेदांत-फॉक्सकॉन' टिकवता आले नाही"
Foxconn Vedanta Deal: वेदांत फॉक्सकॉनने महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये २० अब्ज डॉलरचा प्रकल्प उभारत असल्याचे समोर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) महाराष्ट्राचे हित साधत आहेत की गुजरातचे (Gujarat) हित साधत आहेत असा सवाल साऱ्यांच्या मनात असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. तसेच, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याची किंमत म्हणूनच वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर गेला, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. त्यासोबत, मुख्यमंत्री शिंदे गुजरातसमोर लाचार असून त्यामुळेच महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकॉन त्यांना टिकवता आला नाही, असेही तपासे म्हणाले.
वेदांत-फॉक्सकॉन महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये २० अब्ज डॉलरचा प्रकल्प उभारत असल्याचे समोर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे हित साधत आहेत की गुजरातचे? असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते @maheshtapase यांनी केला आहे. #NCPpic.twitter.com/M2ZoBmNdNv
— NCP (@NCPspeaks) September 14, 2022
"महाराष्ट्रातील मागील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीसाठी वेदांत फॉक्सकॉनशी योग्य संवाद व चर्चा सुरू केली होती आणि तळेगावचे ठिकाण निश्चित करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने वेदांत फॉक्सकॉनला सर्वोत्तम प्राधान्य दिले होते. वेदांत फॉक्सकॉनसह व्यवसायाच्या संधीची वाट पाहणाऱ्या अनेक लहान उद्योजकांची साखळी त्यामुळे आता पूर्णपणे विस्कळीत झाली", असे महेश तपासे म्हणाले.
तरुणांचे रोजगार घालवल्याबद्दल स्पष्टीकरण द्या!
"नव्याने स्थापन झालेल्या 'ईडी' सरकारला महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकॉन कायम ठेवता आले नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची राज्याच्या विकासाबाबतची उदासीन वृत्ती यात दिसून येते. त्यांनी गुजरातला बळी पडून महाराष्ट्राचे आर्थिक नुकसान आणि लाखो इच्छूक तरुणांचे रोजगार बुडवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील जनतेला आपल्या बंडाचे समर्थन करण्यात व्यस्त आहेत. रोजगार आणि औद्योगिकीकरणासारख्या विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला तरुणांचे रोजगार घालवल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे", अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.