लडाखमधील गलवान खोऱ्यात महाराष्ट्राचा वीरपुत्र शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 13:22 IST2020-06-25T13:20:47+5:302020-06-25T13:22:21+5:30
गलवान खोऱ्यातील नदीवर पूल बांधकाम सुरू असताना दोन सहकारी जवानांना पुरात वाहून जाण्यापासून वाचवताना महाराष्ट्राच्या या वीरपुत्राने हौतात्म्य पत्करले आहे.

लडाखमधील गलवान खोऱ्यात महाराष्ट्राचा वीरपुत्र शहीद
लेह(लडाख)/मालेगाव - चिनी सैन्याकडून सातत्याने सुरू असलेला घुसखोरीचा प्रयत्न, आणि गलवान खोऱ्यात आठवडाभरापूर्वी चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताच्या वीस जवानांना वीरमरण आल्याने सध्या दोन्ही देशांत तणाव निर्माण झालेला आहेत. त्यामुळे गलवान खोऱ्यात सामरिक दृष्ट्या महत्त्वाची असलेली बांधकामे भारतीय लष्कराकडून वेगाने सुरू आहेत. त्यादरम्यान, गलवानमध्ये भारतीय लष्करात सेवेत असलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. गलवान खोऱ्यातील नदीवर पूल बांधकाम सुरू असताना दोन सहकारी जवानांना पुरात वाहून जाण्यापासून वाचवताना महाराष्ट्राच्या या वीरपुत्राने हौतात्म्य पत्करले आहे.
सचिन विक्रम मोरे असे या वीर जवानाचे नाव असून, ते ११५ इंजिनियरिंग रेजिमेंटमध्ये सेवेत होते. सध्या ते गलवान खोऱ्यात कर्तव्यावर होते. शहीद सचिन मोरे हे मालेगाव तालुक्यातील साकुरी गावचे रहिवासी होते. त्यांच्या हौतात्म्याचे वृत्त समजताच गावामध्ये शोककळा पसरली आहे.
भारतीय लष्कराकडून गलवान खोऱ्यात नदीवर पुलाचे बांधकाम सुरू होते. त्यादरम्यान, नदीला आलेल्या पुरात दोन जवान पडले आणि ते वाहून जाऊ लागले. त्यांना वाचविण्यासाठी सचिन मोरे यांनी प्रयत्न केले. मात्र त्यात सचिन यांना वीरमरण आले. ही दुर्घटना काल घडली. सचिन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि आई-वडील असा परिवार आहे.