आवक घटल्याने भाजीपाला महागला
By admin | Published: June 20, 2016 04:10 AM2016-06-20T04:10:26+5:302016-06-20T04:10:26+5:30
रोजच्या जेवणात आवश्यक असलेल्या डाळींबरोबरच भाजीपालाही महागल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांवरील भीषण संकट
प्राची सोनवणे,नवी मुंबई
रोजच्या जेवणात आवश्यक असलेल्या डाळींबरोबरच भाजीपालाही महागल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांवरील भीषण संकट तसेच अत्यल्प पावसामुळे उत्पादन घटले आहे. वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारपेठेतही भाज्यांची आवक घटली असून आठवडाभरात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.
पाणीटंचाईमुळे भाजीपाला उत्पादकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. वाढत्या दरांमुळे गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे. दोन आठवड्यांपूर्वी ५०० ते ५५० ट्रक आणि टेम्पोची आवक होत होती. या आठवड्यात सरासरी ३०० ते ३५० ट्रक आणि टेम्पोची आवक झाली आहे. टोमॅटोचे भाव दिवसागणिक वाढत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टोमॅटोचे भाव दुपटीने वाढले आहेत. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आवक घटल्याने आणि उत्पादनापेक्षा मागणी वाढत असल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ९० रुपये किलो दराने विकली जाणारी फरसबी सध्या ११० रुपये किलोने दराने उपलब्ध आहे. गवार ८० ते ९० रुपये, घेवडा १७० ते १८० रुपये, भेंडी ६० ते ७५ रुपये, दोडके १०० ते १२० रुपये, कोबी ४० ते ५०, फ्लॉवर ८० ते ९० रुपये, शेवग्याच्या शेंगा १०० ते १२० रुपये, तोंडली ६० ते ७० रुपये, वांगी ६० ते ७० रुपये, दुधी ७० ते ८० रुपये, कोथिंबीरची एक जुडी १० ते ३० रुपये तर पालेभाजीची एक जुडी २० ते ३० रुपये दराने विकली जात आहे. यंदा चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.