भाज्या-फळे एफडीएच्या रडारवर
By admin | Published: January 7, 2015 01:38 AM2015-01-07T01:38:31+5:302015-01-07T01:38:31+5:30
प्रदूषणाचा विळखा बसलेल्या मुंबईकरांना आता स्वच्छ भाज्या व फळे लवकरच उपलब्ध होणार आहेत़ यासाठी अन्न व औषध प्रशासन मोहीम हाती घेणार
पूजा दामले - मुंबई
प्रदूषणाचा विळखा बसलेल्या मुंबईकरांना आता स्वच्छ भाज्या व फळे लवकरच उपलब्ध होणार आहेत़ यासाठी अन्न व औषध प्रशासन मोहीम हाती घेणार असून, मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी याद्वारे घेतली जाणार आहे़ त्यामुळे आधी मासे आणि आता भाज्या-फळेही एफडीएच्या रडारवर असणार आहेत.
ताज्या, स्वच्छ, नैसर्गिकरीत्या पिकलेल्या भाज्या खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. पण बाजारात येणाऱ्या भाज्यांवर कोणती प्रक्रिया झालेली आहे का, त्या भाज्या कुठे ठेवल्या होत्या, याविषयी ग्राहकाला कोणतीच माहिती नसते. यामुळे ग्राहकांची फसवणूक होते आणि त्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत असतो. यापुढे ग्राहकांची अशाप्रकारे फसवणूक होऊ नये, म्हणूनच ‘अन्न साक्षरता व अन्न सुरक्षा महाअभियान’च्या पुढच्या टप्प्यात अन्न व औषध प्रशासन भाज्या आणि फळांवर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती प्रशासनाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली. काही भाज्यांना रंग लावले जातात, भाज्या चांगल्या दिसाव्यात म्हणून काही वेळा केमिकल्सचाही वापर केला जातो. भाज्यांच्या मोहिमेत आधी या प्रकारांकडे लक्ष देण्यात येणार आहे. यानंतर हळूहळू त्या कुठे ठेवल्या जातात, कुठून येतात, हे शोधले जाणार आहे. यात सर्व भाजी विक्रेत्यांचा समावेश करण्यात येईल. शेतकऱ्यांपर्यंत जाऊन तपासणी करणे, पुढे कुठे भाज्या ठेवल्या जातात, हे तपासणे इतके सर्व मनुष्यबळ कमी असल्यामुळे करणे सध्या शक्य नाही. ही संकल्पना अजून प्राथमिक स्वरूपात आहे, असे आयुक्त भापकर यांनी सांगितले. अन्न साक्षरता व अन्न सुरक्षा अभियान सुरू करण्याचा मुख्य उद्देश हा जनतेला शुद्ध, निर्भेळ अन्न आणि दूध मिळण्याचा अधिकार असून, त्यांना तो मिळवून दिला पाहिजे. यामुळे प्रशासन विक्रेत्यांवर कारवाई करीत आहे, असे भापकर यांनी सांगितले.
अभियान सुरू झाल्यापासून भेसळयुक्त दुधावर एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये ९५ दूध नमुने तपासण्यात आले होते. यापैकी १० नमुने हे कमी दर्जाचे आढळले होते.
यानंतर प्रशासनाने मासे विक्रेत्यांची नोंदणी आहे की नाही, याविषयी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम अंतिम टप्प्यात आल्यावर भाज्यांकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे.