जुन्नरच्या शेतातील भाजी थेट शहरात
By Admin | Published: July 21, 2016 04:01 AM2016-07-21T04:01:57+5:302016-07-21T04:01:57+5:30
पाले व फळभाज्यांच्या दरांनी शंभरी ओलांडल्याने गृहिणींचे बजेटच कोलमडले आहे.
डोंबिवली : पाले व फळभाज्यांच्या दरांनी शंभरी ओलांडल्याने गृहिणींचे बजेटच कोलमडले आहे. पण, सरकारने शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला थेट बाजारात विकण्याची परवानगी दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. ‘शेतकरी आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ५ जुलैपासून जुन्नर येथील शेतकरी त्यांच्या शेतातील ताजी भाजी पूर्वेतील सूतिकागृहाजवळ विक्रीसाठी आणत आहेत. ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची विशेषत: गृहिणींची गर्दी होत आहे.
जुन्नर तालुक्यातील सुरेश गायकवाड व त्यांचे सहकारी हे त्यांच्या शेतात पिकणारा दीड टन भाजीपाला विक्रीसाठी घेऊन आले आहेत. काही शेतकऱ्यांनी मिळून ‘ब्रह्मानंद शेतकरी बचत गट’ तयार केला आहे. एका गटात प्रत्येक गावातील १० शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकरी दरमहा १०० रुपये वर्गणी काढतो. त्यातून भाजीपाला वाहतुकीचा खर्च भागवला जातो. एकाच शेतकऱ्यावर मालवाहतुकीचा भार येत नाही. या शेतकऱ्यांना ‘जुन्नर तालुका फार्म शेतकरी कंपनी’तर्फे बी बियाणे पुरवली जातात. भाजीपाला पिकवणारा शेतकरी हा बागायतदार आहे. बागायती ही कष्टाची शेती आहे. पिकासाठी शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागते. त्याचा माल विकला न गेल्यास कर्ज फेडण्याच्या अडचणी त्याच्यासमोर उभ्या ठाकतात.
गायकवाड यांनी सांगितले की, ‘दोन वर्षांपूर्वी आम्ही कल्याणमधील ग्राहकाला आमच्या शेतातील माल थेट विकला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तो अनुभव आमच्या गाठीशी आहे. हंगामानुसार भाजीपाल्याचा भाव कमीजास्त ठरतो. आमच्याच शेतातील माल आम्ही स्वत: विकत असल्याने दलालीचे पैसे वाचतात. तसेच दलाल नसल्याने आमच्या मालाला चांगला भाव मिळत आहे.’
शेतकऱ्यांसाठी सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या ‘शॉप फॉर चेंज फेअर ट्रेण्ड’ने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या संस्थेचे समीर आठवले यांनी सांगितले की, ‘शेतकऱ्यांचा माल दलालाशिवाय थेट विकला जावा. त्याला योग्य भाव मिळावा, हाच हेतू आमच्या संस्थेचा आहे. शेतकऱ्याला नफा व ग्राहकाला कमी दरात भाजीपाला, असा दुहेरी उद्देश त्यातून साध्य होत आहे. जुन्नर तालुक्यातील ३० ते ४० शेतकऱ्यांची नियमनमुक्ती केली जात नव्हती. त्याकरिता, संस्थेने पुढाकार घेतला. शेतकरी त्याचा दर ठरवून त्याचा भाजीपाला विकत आहे. दर ठरवण्याचे स्वातंत्र्य त्याला या उपक्रमातून मिळत आहे. उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आहे. अन्य बचत गटांना त्यात सामावून घेण्यात येणार आहे.’
भाजी घेण्यासाठी आलेल्या प्रतिभा सोमण यांनी सांगितले की, ‘चांगली भाजी कमी किमतीत मिळते. तसेच गावाकडची ताजी भाजी असल्याने या उपक्रमामुळे नाल्यावर पिकवल्या जाणाऱ्या भाजीला आळा बसण्यास मदत होईल.’ (प्रतिनिधी)