भाजीपाला, दूध रस्त्यावर

By Admin | Published: June 2, 2017 02:03 AM2017-06-02T02:03:08+5:302017-06-02T02:03:08+5:30

पुणे जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत गुरुवारी शेतकरी संपाचा चांगलाच परिणाम जाणवला. शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर

Vegetable, milk on the road | भाजीपाला, दूध रस्त्यावर

भाजीपाला, दूध रस्त्यावर

googlenewsNext

जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत गुरुवारी शेतकरी संपाचा चांगलाच परिणाम जाणवला. शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले. शेतमाल घेऊन जाणाऱ्या गाड्या रोखल्या. दूध रस्त्यावर ओतले. आठवडे बाजार बंद पाडले; मात्र कोणताही अनुचित प्रकार यादरम्यान घडला नाही. संपाचा परिणाम उद्यापासून जाणवण्यास सुरुवात होईल.

कासुर्डी येथे महामार्गावर शेतीमालाचा अक्षरश: रेंदा
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : तालुक्यात पुणे-सोलापूर महामार्गावर कासुर्डी (ता. दौंड) येथे शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करीत महामार्गावरून शेतीमाल घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवून शेतीमाल महामार्गावरून फेकून दिला. या वेळी महामार्गावर शेतीमालाचा खच पडून वाहतूक विस्कळीत झाली होती; तर कांदा, बटाटा, कलिंगड, अंडी, कैरी आदी शेतीमालाच्या गाड्यांच्या गाड्या महामार्गावर टाकण्यात आल्याने महामार्गावर शेतीमालाचा अक्षरश: रेंदा झाला होता. यात मोठ्या गाड्या अडकत होत्या, तर दुचाकी घसरून पडत होत्या. पाटस येथील टोलनाक्याच्या परिसरात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेतकरी एकत्र आले.
भाजीपाला रस्त्यावर अस्ताव्यस्त फेकला. हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले, कुरकुंभ येथील आठवडे बाजार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पाटस येथील टोलनाक्याच्या परिसरात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेतकरी एकत्र आले.
कुरकुंभ येथील आठवडे
बाजार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात
आला. त्याप्रमाणे आलेल्या प्रत्येक व्यापारी व शेतमाल बाजारात विकणाऱ्या शेतकऱ्याला, तसेच प्रत्येक छोट्या वस्तूच्या विक्रेत्याला ‘बाजार बंद’ म्हणून सांगण्यात आले. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात व्यापारी व शेतकरी निराश होऊन माघारी परतले.


पुरंदर तालुक्यात संपाला संमिश्र प्रतिसाद
राज्यातील शेतकरी संपावर
गेल्याने पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संपाला मोठा
प्रतिसाद मिळाला; मात्र संपाची नेमकी दिशा न समजल्याने तालुक्यातून या संपाला संमिश्र प्रतिसादच मिळाला आहे; मात्र उद्यापासून तालुक्यात कडकडीत संप पाळण्यात येणार असल्याचे ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या अडविल्या

नारायणगाव : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला जुन्नर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ ठिकठिकाणी आंदोलने होऊ न पुणे किंवा मुंबईकडे जाणाऱ्या भाजीपाल्याच्या गाड्या अडवून कांदा, मेथी, टोमॅटो रस्त्यावर फेकून देऊन शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला़ बाजार समितीमधील सर्व व्यवहार आज ठप्प होते़ सर्वत्र शुकशुकाट दिसून आला़ दरम्यान, ओतूर येथे रात्री मोठ्या प्रमाणात तरकारीची खरेदी-विक्री झाली़ रात्री १२ पासूनच गाड्या बंद केल्याने १0 ट्रक तरकारी ओतूर येथे पडून आहेत़ पुढे गेलेल्या गाड्यांनासुद्धा अडविण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी तरकारी पुढे पाठविली नाही़ ओतूर मार्केटमध्ये काकडी, फ्लॉवर व इतर तरकारी मोठ्या प्रमाणात पडून आहेत़ शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे अदा झालेले असून, पडून राहिलेल्या मालाचे नुकसान व्यापाऱ्यांना सोसावे लागला़

बारामती, जळोची बाजारात लिलाव बंद
राज्यात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाची झळ बारामतीच्या बाजारालादेखील बसली. आज गुरुवार आठवडे बाजार असतानादेखील संतप्त शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी जळोची येथील उपबाजारातील लिलाव आज सकाळी बंद पाडले, तर बाजार समितीच्या आवाराला कुलूप ठोकले. व्यापारी, अडते व विक्रेत्यांनी या संपाला पाठिंबा देत येणाऱ्या बुधवारपर्यंत बाजार समितीतील सर्व लिलाव बंद ठेवण्याचा
निर्णय घेतला. याचदरम्यान किरकोळ भाजीपाला विक्री करणाऱ्या गणेश मंडईतील भाजीपाला विक्रीला शेतकऱ्यांनी विरोध केला. मात्र, किरकोळ विक्रेत्यांनी अगोदरच माल खरेदी केला होता. या मालाची विक्री आज झाल्यानंतर शुक्रवारपासून बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.

इंदापूर : डाळिंब व भुसार मालावर मोठा परिणाम
इंदापूर : तालुक्यात कुणाच्या कसल्याही आवाहनाशिवाय शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने राज्यव्यापी संपात सहभाग घेतला.
या संपाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब व भुसार मालाच्या बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. आज बाजार असताना या दोन्ही शेतमालाची आवकच झाली नाही. त्यामुळे एकाच दिवसात बाजार समितीच्या उलाढालीत सुमारे चार कोटींची घट झाली. दूध संकलन न झाल्याने उपपदार्थ निर्मितीसाठी लागणाऱ्या सुमारे साडेपाच कोटी रुपयांची दूध खरेदी थांबली, असे सोनाई दूध संघाच्या वतीने स्पष्ट केले.

तालुक्यात सुमारे १० लाखांची उलाढाल ठप्प
शिरूर : तालुक्यात काही भागातील अपवाद वगळता आज शेतकरी संपाचा चांगलाच परिणाम जाणवला. अनेक गावांत शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले, भाजीपाला, तरकारी, भुसार मालाची आवक रोडावली. अनेक गावांत शेतकऱ्यांनी आवाहन केल्याने कडकडीत बंद पाळण्यात आला. शिरूर शहरात भाजीपाला, तरकारी, भुसार मालाची जवळपास दहा लाखांची उलाढाल ठप्प झाली. शेतकरी आंदोलकांनी दुधाची गाडी फोडली.

भोर तालुक्यात दूध संकलनच झाले नाही
भोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दूध न घालण्याचा निर्णय घेतल्याने
शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्थांनी आज दूध संकलन
न करता, दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध नोंदविला ८ ते ९ हजार लिटर दुधाचे संकलन करून
पुण्याला पाठवले जाते. पुरंदर तालुक्यात सासवड येथे उद्यापासून भाजी बाजार व दूध संकलन बंद करण्यात येणार आहे.

Web Title: Vegetable, milk on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.