सांडपाण्यावर भाजीचा मळा

By admin | Published: April 3, 2017 03:36 AM2017-04-03T03:36:02+5:302017-04-03T03:36:02+5:30

कोपरी येथे दहा एकरच्या प्रशस्त जागेवर भाज्यांचा मळा फुलविला जात आहे.

Vegetable mud on sewage | सांडपाण्यावर भाजीचा मळा

सांडपाण्यावर भाजीचा मळा

Next

नवी मुंबई : कोपरी येथे दहा एकरच्या प्रशस्त जागेवर भाज्यांचा मळा फुलविला जात आहे. विशेष म्हणजे त्यासाठी सर्रासपणे शेजारच्या मोठ्या गटारातील पाण्याचा वापर केला जात आहे. आरोग्यास हानिकारक असलेल्या या पालेभाज्या शहरातील किरकोळ विक्रेते व लहान-मोठ्या हॉटेल्सला पुरविला जात आहेत. या भाज्यांचे सेवन केल्याने विविध गंभीर स्वरूपाचे आजार बळावण्याची शक्यता आहारतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मुंबईसह नवी मुंबईतील रेल्वे मार्गालगतच्या मोकळ्या जागेवर पिकणाऱ्या भाज्यांच्या दर्जाविषयी नेहमीच चर्चा होत आहे. या भाज्या गटाराच्या दूषित पाण्यावर पिकविल्या जात असल्याने त्या आरोग्यास अपायकारक असतात. यात मोठ्याप्रमाणात रासायनिक घटक असल्याने गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची शक्यता वारंवर तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानंतरसुध्दा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे विषारी भाज्यांचे हे मळे सुरूच असल्याचे दिसून आले आहे. रेल्वेलगतच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण होवू नये, यासाठी रेल्वेने ग्रो मोर फूड योजनेअंतर्गत त्या भाजी पिकविण्यासाठी भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. यात बहुसंख्य परप्रांतीय नागरिक आहेत. जागा भाडेतत्त्वावर देताना रेल्वेने काही भाज्यांचा दर्जा राखला जावा, यासाठी काही नियम व अटी घालून दिल्या होत्या. मात्र संबंधितांकडून या नियमाला सपशेल हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. पालेभाज्या पिकविण्यासाठी सर्रास गटाराच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे.
कोपरी सेक्टर २६ येथे रेल्वेच्या मालकीची जवळपास दहा एकर मोकळी जागा आहे. रेल्वेने काही वर्षांपूर्वी एका परप्रांतीय नागरिकाला ती भाजी पिकविण्यासाठी भाडेतत्त्वावर दिली आहे. या ठिकाणी पालक, मुळा, चवळी, लाल माठ, माठ आदी प्रकारच्या भाज्या पिकविल्या जातात. या पिकासाठी सर्रासपणे गटाराचे पाणी वापरले जात आहे. त्यासाठी एका कोपऱ्या मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. त्यात शेजारच्या नाल्याचे पाणी साठवून ते पिकांना पुरविले जाते. येथे पिकणाऱ्या भाज्या शहरातील किरकोळ विक्रेते व छोट्या उपाहारगृहांना पुरविल्या जात असल्याचे दिसून आले आहे.
मुंबईत मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला कारशेड, सायन, माटुंगा, दादर, करीरोड, भायखळा व चिंचपोकळी या स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळालगतच्या दुतर्फा व रुळांच्या मध्ये या भाज्या पिकविल्या जातात. त्यासाठी नजीकच्या गटारातील सांडपाण्याचा वापर केला जातो. तर नवी मुंबईत तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या स्थानकादरम्यान रेल्वे रुळालगतच्या मोकळ्या जागेवर या भाज्यांचे पीक घेतले जाते. त्यासाठी शेजारच्या कारखान्यातून नाल्यात सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्याचा वापर केला जातो.
सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात लेड, आर्सेनिक, पारा आदी जडधातूंचे प्रमाण असते. या धातूमिश्रित पाण्यावर पिकविलेल्या भाज्या आरोग्यास हानिकारक असतात. या भाज्या खाल्ल्याने त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होवू शकतात. तसेच त्यामुळे अनेक गंभीर स्वरूपाचे आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशाप्रकारे दूषित पाण्यात पिकविल्या गेलेल्या भाज्यांचे सेवन करू नये, असे आहारतज्ज्ञांकडून सांगितले जाते.

Web Title: Vegetable mud on sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.