भाज्यांचे भाव घसरले
By Admin | Published: January 22, 2016 03:28 AM2016-01-22T03:28:40+5:302016-01-22T03:28:40+5:30
गुजरात, कर्नाटकपासून मध्य प्रदेश, राजस्थानवरून भाजीपाल्याची आवक होऊ लागल्यामुळे बाजारभाव घसरू लागले आहेत. कोबी, फ्लॉवर, मटार यासह इतर वस्तूंचे दरही कमी झाले आहेत
नवी मुंबई : गुजरात, कर्नाटकपासून मध्य प्रदेश, राजस्थानवरून भाजीपाल्याची आवक होऊ लागल्यामुळे बाजारभाव घसरू लागले आहेत. कोबी, फ्लॉवर, मटार यासह इतर वस्तूंचे दरही कमी झाले आहेत.
महागाईमुळे २०१५मध्ये सर्वसामान्य ग्राहकांच्या किचनचे बजेट बिघडले होते. पाऊसही समाधानकारक झाला नसल्याने पुढील वर्षभर भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती, परंतु मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ जानेवारीपासून आवक प्रचंड वाढली आहे. रोज ५०० ते ५६० ट्रक, टेम्पोची आवक होते, परंतु सोमवारी तब्बल ७६५ ट्रक आले. चारही दिवस चांगली आवक झाल्याने दर कमी झाले.
डिसेंबरमध्ये होलसेलमध्ये ८ ते १२ रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या दुधी भोपळ्याचे दर ४ ते ८ रुपये किलो झाले आहेत. भेंडी १६-३० रुपयांवरून १२ ते २४ रुपये झाली आहे. किरकोळ मार्केटमध्येही ४० ते ६० रुपये किलो दराने चांगली भाजी मिळत आहे. परराज्यांतील मालामुळे भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.