भाजीपाल्याचे दर घसरले, भेंडी, कोबी ५ रुपये किलो
By admin | Published: August 31, 2016 05:43 AM2016-08-31T05:43:45+5:302016-08-31T07:31:38+5:30
शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने भाजीपाला नियमनमुक्त केला. परंतु प्रत्यक्षात बाजारभाव वाढण्याऐवजी प्रचंड घसरले आहेत.
नामदेव मोरे , नवी मुंबई
शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने भाजीपाला नियमनमुक्त केला. परंतु प्रत्यक्षात बाजारभाव वाढण्याऐवजी प्रचंड घसरले आहेत. दोन महिन्यांत टोमॅटोचे दर १० पट तर भेंडीचे दर ८ पट कमी झाले आहेत. भाजीपाला विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहेत.
प्रत्येक वर्षी आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळत असतो. चांगला बाजारभाव मिळावा यासाठी अनेक शेतकरी मार्चपासून कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतात. परंतु या वर्षी अचानक आॅगस्टमध्ये भाव कोसळले आहेत. राज्यातील बहुतांश सर्व होलसेल मार्केटमध्ये कांदा २ ते ८ रुपये किलो दराने विकला जात आहे. काही ठिकाणी १ रुपया किलो दरानेही कांदा विकला जात आहे. कांद्यापाठोपाठ इतर भाज्यांचे भावही शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी काढू लागले आहेत. जूनमध्ये मुंबई एपीएमसीमध्ये भेंडी ४० ते ४४ रुपये किलो दराने विकली जात होती. सद्य:स्थितीत हे दर ५ ते १२ रुपये झाले आहेत. १६ ते २० रुपयांचा कोबी ४ ते ६ रुपयांना विकला जात असून, टोमॅटो ४० रुपयांवरून ४ रुपये किलो झाले आहेत.
राज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये अशीच स्थिती आहे. कोल्हापूरमध्ये कोबी ३ ते ६ व टोमॅटो २ ते ६ रुपये किलो दराने विकला जात आहे. दोन महिन्यांत ८ ते १० पट भाव घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईमध्ये विक्रीसाठी आलेल्या काही शेतकऱ्यांना विक्रीतून उत्पादनासाठी लागलेला खर्चही मिळेनासा झालेला आहे. दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात पाव किलो भाजी घेण्यासाठी २० ते २५ रुपये मोजावे लागत होते. परंतु आता शेतकऱ्यांना एक किलो भाजीसाठीही तेवढे पैसे मिळत नाहीत. १५ रुपये किलोपेक्षा जास्त भाव मिळत नाही.