नवी मुंबईत भाजीपाला विक्री सुविधा
By Admin | Published: January 7, 2017 02:55 AM2017-01-07T02:55:21+5:302017-01-07T02:55:21+5:30
जिल्ह्यातील शेतीउत्पादक शेतकऱ्यांस त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळावा
जयंत धुळप,
अलिबाग- जिल्ह्यातील शेतीउत्पादक शेतकऱ्यांस त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळावा आणि ग्राहकाला तो माल वाजवी दरात खरेदी करता यावा, या हेतूंच्या शासनाच्या माध्यमातून आॅगस्ट २०१६ पासून हाती घेण्यात आलेले ‘संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान’ शेतकरी आणि ग्राहक या उभयतांकरिता एक वरदान ठरत आहे. पुणे कृषी पणन मंडळाकडून या आठवडे बाजाराकरिता जागा उपलब्ध करून देण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात बेलापूर (नवी मुंबई) येथील सुनील गावस्कर मैदान येथे पेण तालुक्यातील चार, तर कर्जत व उरण तालुक्यांतील प्रत्येकी एक, अशा सहा शेतकऱ्यांच्या एकूण १७५० किलो भाजीपाल्याची विक्रमी विक्री झाली आहे. त्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळत असल्याची माहिती कृ षी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
अभियानांतर्गत आदिती उत्पादक कंपनी (वडखळ-पेण) यांनी कारली, वांगी, फरसबी, मिरची, दुधी, कांदा पात, मेथी, मुळा, कोबी, टोमॅटो, घेवडा असा एकूण ६३० किलो भाजीपाला आठवडा बाजारामध्ये विक्री केला. कर्जत तालुक्यातील सोमजाई शेतकरी उत्पादक गट लाखरण यांनी टोमॅटो, काकडी, मिरची, फरसबी, पाल, मेथी, मुळा असा एकूण १७० किलो भाजीपाला आठवडा बाजारामध्ये
विक्री केला. तर उरण तालुक्यातील चंद्रकांत धनाजी ठाकूर (केगांव) यांनी काकडी, कारली, टोमॅटो, वांगी, वाल, पालक, दुधी, मुळा, मिरची, कोबी असा एकूण ९५० किलो भाजीपाला विक्र ी केला. या आठवडा बाजारामध्ये शेतकरी उत्पादक गटांना चांगला हमीभाव मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी आपला उत्पादित शेतमाल पणन मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या जागेमध्ये नेऊन त्या ठिकाणी विक्री करावयाचा आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव व ग्राहकाला वाजवी दरात तो मिळेल. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना आपला उत्पादित शेतमाल सुनील गावस्कर मैदान सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे दर शनिवारी, वाशी सेक्टर-४ येथे दर रविवारी, विधानभवन मुंबई येथे दर रविवारी आठवडी बाजारात
विक्रीकरिता नेता येणार असून, या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
>शेतकऱ्यांना हमीभाव
जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील सुमारे ४७०० शेतकरी भाताच्या खरीप हंगामानंतर वाल, तोंडली व इतर भाजीपाला लागवड करतात. या अभियानाच्या माध्यमातून या सर्व शेतकऱ्यांना नवी, खात्रिशीर आणि हमीभावाची व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहे. बेलापूरनंतर आता वाशी आणि विधानभवन येथे थेट भाजीपाला विक्र ी सुविधा केंद्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या संधीचा लाभ घेण्याकरिता व अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, कार्यालयातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याशी संपर्कसाधण्याचे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक एस.एस.डावरे यांनी केले आहे.