एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची चोरी

By admin | Published: August 2, 2016 02:39 AM2016-08-02T02:39:42+5:302016-08-02T02:39:42+5:30

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या मुंबई बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्येच शेतमालाची चोरी होवू लागली आहे.

Vegetable theft in the APMC market | एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची चोरी

एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची चोरी

Next

नामदेव मोरे,

नवी मुंबई- शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या मुंबई बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्येच शेतमालाची चोरी होवू लागली आहे. रात्री ३ ते सकाळी ७ दरम्यान कामगारच भाजीपाल्याची चोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांनीही याविषयी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. परंतु प्रशासनाला चोरी थांबविण्यात अपयश आले आहे.
राज्य शासनाने भाजीपाल्याची थेट विक्री करण्यास परवानगी दिल्यानंतर राज्यभरातील बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मालाला बाजार समितीमध्येच संरक्षण मिळत असल्याचा दावा करण्यात आला. शेतकऱ्यांनीही बाजार समित्यांवर विश्वास ठेवून आपला माल तेथेच विक्रीसाठी पाठविण्यास सुरवात केली आहे. परंतु वास्तवामध्ये मुुंबई बाजारसमितीमध्येच शेतकऱ्यांच्या मालाची चोरी होत असल्याचे निदर्शनास आला आहे.
भाजीपाला मार्केटमधील व्यवहार पहाटे तीन वाजता सुरू होतात. राज्याच्या कानाकोपऱ्यासह गुजरात, कर्नाटकवरूनही कृषीमाल विक्रीसाठी येत असतो. कृषी माल खाली करण्यासाठी रोजंदारीवर काम करणारे व काही प्रमाणात माथाडी कामगार मालाची चोरी करत आहेत. ४०० ते ५०० कामगार डोक्यावर गोणीचा झोला घेवून मालाची चढ-उतार करत असतात. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पाठविलेला माल काढून त्या गोणीमध्ये ठेवला जातो. पहाटेपर्यंत अनेकजण ५ ते २५ किलो भाजीपाला काढतात. पूर्वी हा माल साठविण्यासाठी प्रत्येक गाळ्यात पेट्या ठेवल्या जात होत्या. परंतु त्याला आक्षेप घेतल्यामुळे आता कपडे व इतर साहित्य ठेवण्याच्या ठिकाणी हा माल ठेवला जातो. यामधील काही मार्केटमध्येच किरकोळ विक्रेत्यांना विकला जातो. उर्वरित माल कामगार घरी घेवून जातात. चोरी केलेल्या मालाची कोपरखैरणे व इतर ठिकाणी विक्री केली जात आहे.
कोपरखैरणे सेक्टर ५, ६, १५ मध्ये रोडवर सायंकाळी भाजीपाल्याची विक्री सुरू असते. यामधील ९० टक्के माल चोरीचा असतो.
एपीएमसीमध्ये रोज ५०० ते ६५० ट्रक व टेंपोची आवक होत असते. १८०० ते २२०० टन माल विक्रीसाठी येत असतो. यामुळे कामगारांनी थोडासा माल काढून घेतला तर त्याकडे कोणी गांभीर्याने लक्ष देत नाही. परंतु प्रत्येकाने थोडा माल काढला तरी रोज ३ ते ४ टन मालाची चोरी होत आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
ोतकऱ्यांच्या मालाचे वजन कमी भरल्याने साहजिकच त्यांना पैसेही कमी मिळतात. या व्यतिरिक्तही एपीएमसीमधील अनेक वाहनचालक, गाळ्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती व इतर कामगारही स्वत:च्या घरी फुकट भाजीपाला घेवून जात आहेत. वर्षानुवर्षे हे प्रकार सुरू आहे. व्यापारी संघटनांनी याबाबत अनेक वेळा तक्रार केली होती. यानंतर चोरीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी अद्याप ते पूर्णपणे थांबलेले नाही.
>व्यापाऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी अनेक वेळा शेतकऱ्यांच्या मालाची चोरी थांबविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. या तक्रारीनंतर मार्केटमध्ये चोरीचा माल खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिला विक्रेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. गाळ्यांमध्ये चोरीचा माल ठेवण्यासाठीच्या पेट्या उचलण्यास लावले आहे. परंतु यानंतरही कामगारांकडून व इतर घटकांकडून होणारी चोरी थांबत नसून यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
प्रामाणिक कामगारांचीही बदनामी
भाजीपाला मार्केटमध्ये अनेक माथाडी कामगार प्रामाणिकपणे कृषी मालाची चढ - उतार करण्याचे काम करतात. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे व संघटनेनेही शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होवू नये अशा सूचना दिल्याने त्याचे पालन केले जाते. परंतु यानंतरही ४०० ते ५०० कामगारांनी अद्याप चोरी थांबविलेली नाही. यामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. या ठरावीक कामगारांमुळे प्रामाणिक कामगारांचीही प्रतिमा मलिन होत आहे.
अशी होते चोरी
एपीएमसीमध्ये पहाटे तीन वाजेपासून मोठ्या प्रमाणात मालाची आवक होते. मालाची चढ - उतार करणारे कामगार प्रत्येक गोणीमधून थोडासा माल काढतात व डोक्यावर मागील बाजूला सोडलेल्या झोल्यामध्ये (बारदानाची गोणी ) तो माल टाकला जातो. पहाटेपर्यंत अनेकांकडे ५ ते २५ किलोचा माल जमा होतो. काही जण तेथेच किरकोळ विक्रेत्यांना त्याची विक्री करतात. अनेक जण घरी घेवून जातात व ते वास्तव्य करत असलेल्या परिसरात त्याची विक्री करतात. याशिवाय वाहनचालक व इतर अनेक जण घरी वापरण्यासाठीही भाजीपाला घेवून जात आहेत.

Web Title: Vegetable theft in the APMC market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.