डोंबिवली पश्चिमेत भाजीविक्रेते रस्त्यावर
By admin | Published: May 18, 2016 03:21 AM2016-05-18T03:21:17+5:302016-05-18T03:21:17+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विकास आराखड्यात सार्वजनिक वापरासाठी आरक्षित असलेल्या जागांची संख्या अधिक आहे.
जान्हवी मोर्ये,
डोंबिवली- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विकास आराखड्यात सार्वजनिक वापरासाठी आरक्षित असलेल्या जागांची संख्या अधिक आहे. मात्र पश्चिमेत भाजीमंडई नसल्याने फेरीवाल्यांना रस्त्यावरच ठाण मांडावे लागत आहे. रेल्वेस्थानक परिसरात भाजी मंडाई झाल्यास रस्त्यावरील विक्रेते कमी होतील. परिणामी वाहतुकीला होणारा अडथळाही कमी होईल, याकडे स्वत: भाजीविक्रेत्यांनी लक्ष वेधले आहे.
घनश्याम गुप्ते रोड, द्वारका हॉटेल ते सम्राट चौक, फुले रोड या परिसरात फेरीवाले व भाजीविक्रेते व्यवसाय करतात. हे रस्ते अरुंद असूनही तेथे एकूण ८०० हून अधिक भाजीविक्रेते व्यवसाय करतात. महापालिका प्रशासन त्यांच्याकडून बाजार फीच्या रूपात ३१ रुपये वसूल करते. मात्र त्यांना कोणत्याही स्वरूपाच्या सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत.
रेल्वेस्थानक परिसरातील रस्ते रिक्षा स्टॅडने व्यापले आहेत. त्यातच फेरीवाले व भाजीविक्रेते बसतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिमेत महापालिकेने भाजी मंडई उभारणे गरजेचे आहे. भाजीविक्रेते फेरीवाला प्रकारात मोडत नाही. तरीही ते रस्त्याच्या कडेला बसून व्यापार करीत असल्याने ते फेरीवाल्यात गणला जातो.
महापालिकेने डोंबिवली पश्चिमेतील मच्छीमार्केट विकसीत करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र अजूनही त्याचा विकास झालेला नाही. मच्छीमार्केट बरोबरच भाजी मार्केटचाही विचार करावा, अशी मागणी भाजी विक्रेत्यांकडून केली जात आहे. फेरीवाल्यांच्या हक्कासाठी लढणारे प्रशांत सरखोत यांनी मोर्चा काढून आंदोलन केले होते. त्याची दखल महापालिकेने घेतली नाही.
>पश्चिमेतील फेरीवाल्यांचे
अद्याप सर्वेक्षण नाही
फेरीवाल्यांत भाजी विक्रेते येत नाहीत. पण भाजी विक्रेत्यांसाठी डोंबिवली पश्चिमेत मंडई नाही. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना नाईलाजाने रस्त्यावर व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे तेही फेरीवाल्यात गणले जातात, असे भाजी विक्रेते योगेश मोधवे यांनी सांगितले.
महापालिकेने पूर्वेतील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले आहे. मात्र, पश्चिमेतील सर्वेक्षण केलेले नाही.
पूर्वेतील भाजी मंडईतील भाजी विक्रेत्यांकडून महापालिका दररोज २५ रुपये बाजार शुल्क घेते. मात्र ज्यांना मंडई नाही, अशांकडून दररोज ३१ रुपये शुल्क
घेतले जाते.
पश्चिमेत पालिकेने फेरीवाला व ना-फेरीवाला झोन जाहीर केले आहेत. फेरीवाला क्षेत्रात बसण्याची परवानगी भाजी विक्रेत्यांनी मागितली होती. त्यानुसार भाजी विक्रेते चार वर्षांपासून फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करीत आहेत. त्यांना मंडई मिळाल्यास रस्ते पादचाऱ्यांसाठी मोकळे होतील.
>भाजीविक्रेत्यांसाठी पश्चिमेत भाजी मंडई नाही. त्यामुळे आम्हाला रस्त्यावरच व्यवसाय करावा लागतो. भाजी मंडई बांधल्यास आम्ही मंडईत व्यसाय करू. तशी सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिल्यास ते सोयीचे होईल.
- गणेश घुप्ता,
भाजी विक्रेते, डोंबिवली.