श्रावणामुळे भाजीपाला महागला! ग्राहकांच्या खिशाला कात्री; जाणून घ्या, होलसेल बाजारातील रेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 10:58 AM2022-08-02T10:58:07+5:302022-08-02T10:59:22+5:30
जाणून घ्या, होलसेल मार्केटमधील भाजीपाल्याचे प्रतिकिलो दर...
नवी मुंबई : श्रावण सुरू होताच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढू लागली आहे. सोमवारी ७४० वाहनांमधून तब्बल ३,८१५ टन भाजीपाल्याची आवक झाली असून, त्यामध्ये ५ लाख ८७ हजार पालेभाज्यांचा समावेश आहे. आवक वाढल्यानंतरही श्रावण मासामुळे बहुतांश वस्तूंचे दर तेजीतच आहेत.
पावसाळा सुरू झाल्यानंतर जुलैमध्ये भाजीपाल्याची आवक घटली होती. बाजार समितीमध्ये प्रतिदिन सरासरी ५०० ते ६०० वाहनांमधून २५०० ते २८०० टन कृषी मालाची आवक होत होती. श्रावण सुरू झाल्यापासून तीन दिवसांत आवक वाढली आहे. सोमवारी विक्रमी आवक झाली आहे. राज्यात पावसाने दडी मारली असून, ऊन वाढल्यामुळे १० ते १५ टक्के भाजीपाला खराब झाला आहे. भाजीपाल्याला ग्राहकांकडूनही मागणी वाढली आहे. आवक जादा होऊनही दर फारसे घसरलेले नाहीत.
अडीच लाख कोथिंबीर जुडीची आवक झाली आहे. दीड लाख पालक व सव्वा लाख मेथी जुडीची आवक झाली आहे. टोमॅटोची सर्वाधिक ४०० टन आवक झाली असल्यामुळे दर नियंत्रणात आहेत.
महिनाभर राहणार भाजीपाल्याला मागणी -
श्रावणामध्ये पुढील एक महिना भाजीपाल्याला मागणी राहणार आहे. बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बाजार समिती संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले की, बहुतांश भाजीपाला व महाराष्ट्रातीलच विविध जिल्ह्यांमधून होत आहे. इतर राज्यातील आवक मर्यादित असल्याचेही सांगितले.
होलसेल मार्केटमधील भाजीपाल्याचे प्रतिकिलो दर -
वस्तू - २८ जुलै १ ऑगस्ट
भेंडी - ३० ते ७५ ३५ ते ७५
दुधी भोपळा - २५ ते ३५ २२ ते ३२
फरसबी - ६० ते ८० ५० ते ७०
फ्लॉवर - १४ ते २० १६ ते २०
गवार - ५५ ते ८० ५० ते ७५
घेवडा - ३८ ते ६८ ५० ते ६०
ढोबळी मिरची - ४० ते ५५ ४० ते ५०
शेवगा शेंग - २८ ते४४ ३२ ते ४०
टोमॅटो - १० ते २२ १२ ते २२