मतमोजणी केंद्राच्या परिसरात वाहनांस बंदी
By admin | Published: May 10, 2014 07:41 PM2014-05-10T19:41:36+5:302014-05-10T21:09:37+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी ज्या केंद्रावर मतमोजणी होणार असेल त्याच्या आजूबाजूच्या परिसरात वाहने आणण्यास बंदी घालण्यात येणार आहे.
मुंबई -लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी ज्या केंद्रावर मतमोजणी होणार असेल त्याच्या आजूबाजूच्या परिसरात वाहने आणण्यास बंदी घालण्यात येणार आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ ३० च्या निवडणुकीची मतमोजणी माहीमच्या रूपारेल महाविद्यालयात होणार असून आजूबाजूच्या परिसरातील स्थानिकांची वाहने वगळून इतरांच्या वाहनांना बंदी घालण्यात आली असल्याचे वाहतूक पोलीस मुख्यालयाकडून सांगण्यात आले.
स्थानिकांची वाहने सोडल्यास इतर सर्व वाहनांना पुढच्या मार्गांवर वाहन नेण्यास बंदी आहे. पहिला मार्ग जे. के. सावंत मार्ग, गुणवंत तोडणकर चौक ते एन.सी. केळकर मार्ग, केळकर नाक्यापर्यंत. दुसरा मार्ग बाळ गोविंददास मार्ग, सेनापती बापट मार्गापासून ते लेडी जमशेदजी मार्गापर्यंत (आश्रय हॉटेल). तिसरा मार्ग पद्माबाई ठक्कर मार्ग, लेडी जमशेदजी मार्ग रोडपासून ते पाच नाका चौकापर्यंत (रूबी मिल). चौथा मार्ग डी.जी. रुपारेल महाविद्यालय गेट नं. २ ते कृष्णकुंज इमारत नं १४३ चे समोरील रस्ता सेनापती बापट मार्गापर्यंत वाहनांमध्ये तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठीच १६ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून मतमोजणी कामकाज संपेपर्यंत वाहनचालकांच्या सोयीसाठी हे बदल करण्यात आली आहे.