वाहनचोरीची तक्रार होणार आॅनलाइन !
By admin | Published: May 29, 2016 12:37 AM2016-05-29T00:37:33+5:302016-05-29T00:37:33+5:30
राज्यभरात वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अद्ययावत पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता घटनास्थळावरूनच वाहनचोरीची तक्रार घेवून काही मिनिटांत
- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
राज्यभरात वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अद्ययावत पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता घटनास्थळावरूनच वाहनचोरीची तक्रार घेवून काही मिनिटांत पोलिसांकडून वाहनाचा शोध घेण्याला सुरवात होणार आहे. याकरिता विविध सुविधा उपलब्ध असलेले मोबाइल अॅप्लीकेशन बनवण्याची प्रक्रिया राज्य पोलिसांकडून सुरू असून येत्या काही दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असणाऱ्या टोळ्या राज्यभरातून वाहनचोरी करत आहेत. दुचाकीसह ट्रक, टेंपो व कंटेनर चोरी करुन ते राज्यातच किंवा इतर राज्यात विकले जात आहेत. त्यानुसार राज्यभरात चोरी होणाऱ्या वाहनांची संख्या हजारोंच्या घरात असून अवघ्या नवी मुंबई आयुक्तालयातूनच प्रतिवर्षी सुमारे ५०० ते ६०० वाहने चोरीला जात आहेत, तर मागील सहा वर्षांत सुमारे साडेपाच हजार छोटी-मोठी वाहने नवी मुंबईतून चोरीला गेलेली आहेत. त्यापैकी सुमारे बाराशे वाहनांचा तपास पोलिसांना लागू शकलेला आहे.
वाहनचोरीला आळा घालण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी अनेक टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. परंतु शहरातल्या किंवा शहराबाहेरील सराईत टोळ्यांबरोबरच अंतरराष्ट्रीय वाहनचोर टोळ्यांचे देखील मोठे आव्हान राज्य पोलिसांपुढे आहे.
एका राज्यातली चोरीची वाहने दुसऱ्या राज्यात विकणे, तसेच चोरीच्या वाहनांचे सुटे भाग करुन ते विकणाऱ्या अनेक टोळ्या राज्यात सक्रिय आहेत. या टोळ्या राज्यातून वर्षाला हजारो छोटी-मोठी वाहने चोरत आहेत. अशाच एका टोळीला एपीएमसी पोलिसांनी धुळे येथून अटक देखील केलेली आहे. राज्यभरातील चोरीच्या ट्रकची विल्हेवाट लावून त्याचे उपयोगी भाग मुंबई व नवी मुंबई परिसरात ते विकत होते. अशा टोळ्यांच्या मुसक्या आवळून वाहनचोरीच्या घटनांची उकल करण्यासाठी राज्य पोलिसांकडून मोबाइल अॅप्लीकेशन तयार करण्याचे काम सुरू आहे.
अनेकदा एका पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या चोरीच्या वाहनाची माहिती दुसऱ्या पोलीस ठाण्यातील पोलिसांना नसते. परिणामी चोरीचे वाहन बेवारस म्हणून पडलेले असतानाही त्याचा छडा लागत नाही. मात्र या अॅप्लीकेशनमुळे यापुढे बेवारस वाहनांचाही उलगडा पोलीस करू शकणार आहेत. ही प्रक्रिया अधिक सक्षमतेने राबविण्यासाठी गुन्हे शाखेअंतर्गत विशेष तपास पथक कार्यरत करण्यात आले आहे.