वाहनांच्या ‘एक्स्प्रेस’ रांगा
By admin | Published: July 26, 2015 02:32 AM2015-07-26T02:32:10+5:302015-07-26T02:32:10+5:30
आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू असल्याने एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे.
खालापूर : आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू असल्याने एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह स्थानिकांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याने संतापाचे वातावरण आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर धोकादायक दरडी हटविण्याचे काम शुक्र वारपासून सुरू करण्यात आले. काम सुरू असताना एक्स्प्रेस-वे बंद ठेवण्यात आला असून एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक जुन्या मार्गाने वळविण्यात आली आहे. यामुळे जुन्या मार्गावर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना अनेक तास अडकून राहावे लागले. त्यामुळे लहान मुले, वृद्ध व महिला यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसला. खालापूर टोलनाका ते सायमाळ या दरम्यान अनेक वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. खोपोली शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. काम सुरू असताना अडथळा येऊ नये म्हणून बोरघाटापासून खालापूर टोलनाक्यापर्यंतची वाहतूक जुन्या मार्गावरून वळविण्यात आली आहे. (वार्ताहर)
आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढल्या जात असल्याने एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक बंद ठेवून जुन्या मार्गाने वळविण्यात आली आहे. जुन्या मार्गाची क्षमता नसतानाही वाहतूक सुरू राहावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र हा मार्ग अतिशय अरुंद असल्याने गेले दोन दिवस प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. प्रवाशी व स्थानिकांची दोन दिवस गैरसोय झाली असून वाहतूक कोंडीवर उपाय काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- समाधान पवार,
पोलीस अधीक्षक वाहतूक विभाग