ठाणे, पुणे क्षेत्रात वाहनांची ‘भाऊगर्दी’
By admin | Published: October 13, 2016 06:40 AM2016-10-13T06:40:42+5:302016-10-13T06:40:42+5:30
दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहने, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि भेडसावणारी पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यात सरकार व प्रशासन अपयशी ठरत असताना राज्यात ठाणे
मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहने, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि भेडसावणारी पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यात सरकार व प्रशासन अपयशी ठरत असताना राज्यात ठाणे, वसई, कल्याण, वाशी या क्षेत्रात तब्बल ३२ लाख ५० हजार १८८ वाहने रस्त्यावर धावत असल्याची आकडेवारी समोर आली असून राज्यात सर्वाधिक वाहन संख्या असलेले हे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र ठरले आहे. पहिला क्रमांक पुणे क्षेत्राचा असून तेथे ५८ लाख वाहने रस्त्यावर आहेत. मुंबईचा क्रमांक तिसरा आहे.
पुणे क्षेत्रात (पुणे, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, बारामती, अकलूज) वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तेथे ५८ लाख वाहने धावत आहेत. यानंतर मुंबई शहराचा क्रमांक लागतो. मुंबईत आता २८ लाख वाहने धावत असल्याची नोंद आरटीओकडे आहे. वाहन नोंदणी आणि लायसन्सच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ होताना दिसते. राज्यात २०१५-१६ मध्ये २३ लाख ११ हजार ४५१ नवीन वाहनांची नोंद झाली. त्यानंतर २०१६ मध्ये एप्रिल ते मेपर्यंत आणखी तीन लाख ९५ हजार वाहनांची भर पडली. गेल्या दोन ते अडीच वर्षांत साधारपणे वाहन नोंदणीत नऊ ते साडेनऊ टक्के वाढ होत आहे. हीच स्थिती लायसन्सचीही असून दोन वर्षांत जवळपास ५ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढ होत आहे. राज्यात एकूण १५ प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि ३५ उप प्रादेशिक परिवहन कार्यालये असून मोठ्या प्रमाणात वाढत जाणाऱ्या वाहन संख्येमुळे ही कार्यालयेही अपुरी पडत आहेत. त्यामुळे आणखी काही कार्यालये स्थापन करण्याचा परिवहन आयुक्त कार्यालयाचा विचार आहे.