कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 04:21 PM2021-09-06T16:21:53+5:302021-09-06T16:22:39+5:30

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांचा बैठकीत घेतला आढावा

Vehicles of Ganesh devotees going to Konkan are exempted from toll Big decision of the government | कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची घोषणा

प्रातिनिधीक छायाचित्र

Next
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

गणेशोत्सवासाठीकोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत. 

आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई आणि अधिकारी उपस्थित होते.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहेत. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता,  सातारा, भुईंज,शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, ताम्हिणी घाट, रत्नागिरी-सावर्डे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उर्वरित कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याची घोषणा करतानाच या वाहनांसाठी स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.  मुंबई-पुणे, पुणे-सातारा, मुंबई-गोवा या महामार्गावरील पथकर नाक्यांवर अधिकचे मनुष्यबळ नेमणूक करुन गणेश भक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने पथकर नाक्यांवर भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 
पथकर नाक्यांवर गणेश भक्तांशी वाद घालू नका, पथकर सवलतीचे स्टीकर्स उपलब्ध करुन देण्याबरोबर पथकर नाक्यांवर रुग्णवाहिका, जलद प्रतिसाद वाहने, जेसीबीबरोबरच पुरेसे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करा. कोविडचे संकट पाहता भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या. 

कोकणात जाणाऱ्या मार्गावर पोलीस तैनात- वळसे-पाटील
कोकणात जाणाऱ्या मार्गावर स्थानिक पोलीसांबरोबरच महामार्ग वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, वाहतूक खोळंबू नये यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

या बैठकीस ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, परिवहन, एसटी महामंडळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आदींचे वरिष्ठ अधिकारी तसेच पथकर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामांची आणि सुविधांची माहिती यावेळी दिली.

Web Title: Vehicles of Ganesh devotees going to Konkan are exempted from toll Big decision of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.