वेंगुर्ला ते मुंबई व्हाया कराची; फिनिक्सभरारी एका मराठी उद्योजकाची 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 03:04 PM2018-08-28T15:04:47+5:302018-08-28T15:05:59+5:30

मराठी उद्योगक्षेत्रात एक आदर्श प्रस्थापित करणाऱ्या अप्पासाहेब मराठे यांची आज 49 वी पुण्यतिथी आहे.

Vengurla to Mumbai via Karachi Life Journey of Marathi businessman | वेंगुर्ला ते मुंबई व्हाया कराची; फिनिक्सभरारी एका मराठी उद्योजकाची 

वेंगुर्ला ते मुंबई व्हाया कराची; फिनिक्सभरारी एका मराठी उद्योजकाची 

Next

-यशवंत मराठे, वसंत मराठे
 स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उद्योगक्षेत्रामध्ये मराठी नावं तशी फारशी कमीच होती. मात्र प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही धाडसी उद्योजकांनी विविध उद्योगांची स्थापना केली आणि ते यशोशिखरावरही नेऊन दाखवले. सखाराम पुरुषोत्तम म्हणजेच अप्पासाहेब मराठे यांनीही आपल्या कुशल नेतृत्त्वगुणांवर एका उद्योगवृक्षाची जोपासना केली. त्यांच्या 49 व्या पुण्यतिथीनिमित्त हा लेख

पहिला कालखंड – १९३० ते १९४८
माझे आजोबा सखाराम पुरुषोत्तम (उर्फ अप्पासाहेब) मराठे यांचा जन्म सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले गावामध्ये १९११ साली झाला. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते १९२९-३० साली मुंबई येथील पी. शाह अँड कंपनी या दुकानात नोकरीला लागले. ३-४ वर्षांनी सदर कंपनीच्या मालकांनी सिंध प्रांतातील कराची येथे शाखा स्थापन केली व तेथे अप्पासाहेबांची मॅनेजर म्हणून नेमणूक करण्यात आली. ही कंपनी मोटरबस बॉडीला लागणारी फिटिंग्ज, रेक्झीन क्लॉथ, वॉटरप्रुफ कॅनव्हास, कुशन स्प्रिंग्ज वगैरे वस्तूंचा विक्री व्यवसाय करीत असे. अप्पासाहेबांच्या कुशल मार्गदर्शनामुळे तो धंदा भरभराटीला येऊन काही वर्षांतच ते कराचीला स्थिरस्थावर झाले. त्यानंतर अप्पासाहेबांनी फेअरडील फार्मसी या नावाने केमिस्ट दुकान काढले व अल्पकाळात नावारुपाला आणले.
१९४२ च्या आसपास 'द सिंध इंडस्ट्रियल अँड फार्मास्युटिकल कंपनी लि.' या कंपनीची अप्पासाहेबांनी स्थापना केली. या कंपनीचे मुख्य कार्यालय कराची येथे होते आणि फॅक्टरी मलीर या उपनगरात होती. ही कंपनी ‘सिपॉल’ या ब्रँड नावाने शार्क लिव्हर ऑईल या व्हिटॅमिनयुक्त औषधाचे उत्पादन करीत असे. हे उत्पादन बनविण्यामागची थोडक्यात कथा अशी आहे की त्या काळात कॉड लिव्हर ऑईल हे व्हिटॅमिनयुक्त औषध परदेशातून भारतात मोठ्या प्रमाणात आयात होत असे. त्यावेळी दुसरे महायुद्ध जोरात चालू होते. त्यामुळे या औषधाची आयात बंद करावी लागली व ते मिळेनासे झाले, पण मागणी तर खूप होती. अप्पासाहेबांनी परिस्थिती नेमकी हेरून, आपल्या देशात हे औषध बनविले पाहिजे असा निग्रह केला. खूप खटपट, अभ्यास व सर्वेक्षण केले असता असे लक्षात आले की, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जामनगर, पोरबंदर, ओखा वगैरेच्या सागरक्षेत्रात शार्क मासे विपुल प्रमाणात उपलब्ध असून त्याचे तेल हे परदेशातून आयात होणाऱ्या कॉड लिव्हर ऑईल इतकेच गुणसंपन्न आहे. याप्रमाणे मलीर, कराची येथील फॅक्टरीत तयार केलेल्या सिपॉलचा खप अर्थातच त्याकाळी बराच मोठा झाला.

कराचीला १९४७ च्या आधी काही हजार मराठी माणसे राहात होती. ब्राह्मण सभा, कराची महाराष्ट्रीय मित्रमंडळ वगैरे सामाजिक संस्था होत्या. माझ्या वडिलांची (सुरेश मराठे) मुंज कराचीच्या ब्राह्मण सभेमध्येच झाली. काही शिक्षणसंस्था व त्यांची हायस्कूल्स होती. या प्रत्येक संस्थांशी अप्पासाहेबांचा निकटचा संबंध होता. उद्योगधंद्यात व्यस्त असूनही ते या सार्वजनिक कामांना वेळ देत असत. त्यामुळे अप्पासाहेबांच्या सल्ल्यांसाठी व मार्गदर्शनासाठी कार्यकर्त्यांचा आणि सर्व स्तरातील लोकांचा कराचीतील त्यांच्या घरी राबता असे. तसेच त्यांचे तेथील मुस्लिम बांधवांशी पण खूप चांगले संबंध होते. तसे जरी ते फार संगतीप्रिय (social) नसले तरी इतरांच्या भावनांचा विचार करणारे होते. सगळ्यांना मदत करण्यात ते अग्रणी होते.

कराचीमध्ये सर्व काही ठीकठाक सुरु असताना १९४७ च्या ऑगस्टमध्ये भारताची फाळणी झाली. कराची (सिंध प्रांत) पाकिस्तानात समाविष्ट झाले. उत्तर भारतातून, मुख्यत्वे पंजाबमधून मुस्लिमांचे लोंढे कराचीमध्ये येऊन थडकू लागले. त्यांना मिळालेल्या पाकभूमीत हिंदू नको होते. हे मुस्लिम निर्वासित होऊन जसे पाकिस्तानात आले, त्याचप्रमाणे पाकिस्तानमधील हिंदूंनी भारतात निघून जावे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे कराचीतील हिंदु कुटुंबांवर हल्ले करणे, खून, मारामाऱ्या, हिंदूंच्या मालमत्तेची नासधूस, आग लावणे व नंतर नंतर दररोज लुटमारीचे प्रकार नित्य घडू लागले. म्हणून अप्पासाहेबांनी त्यांच्या कुटुंबाला मुंबईला पाठविण्याचा निर्णय घेतला. आणि १९४७ च्या सप्टेंबर महिन्यात माझी आजी, वडील आणि आत्या आणि माझे चुलत काका, शंकरअण्णा हे कराचीहून बोटीने मुंबईस आले.

माझे काका सांगतात की “कराची ते मुंबई जलप्रवास हे एक दिव्यच होते, एक कटू अनुभव होता. माणसे व त्यांचे सामान याने बोट खचाखच भरलेली होती. बायका, मुले, तरुण, वयस्क, अतिवृद्ध सर्वच होते. मराठी, सिंधी, गुजराती व अन्य लोक कराचीतील वर्षानुवर्षांचा संसार, घरदार सोडून, थोडेफार सामान घेऊन दु:खद अंत:करणाने निघाले होते. सर्वचजण निर्वासित, समदु:खी. आम्ही सामानाच्या ढिगाऱ्यावर कसेबसे बसून कराची ते मुंबई हा प्रवास केला. एकंदर परिस्थिती भयानक होती.”

मराठे कुटुंबीय सुखरूप मुंबईस पोहोचले, पण अप्पासाहेब हे कराचीतच राहिले. लगेचच तिथून निघणे शक्यही नव्हते कारण मोठा पसारा पाठी होता. सुरुवातीला त्यांना असं वाटलं होतं की जरी फाळणी झाली असली तरी त्यांचा व्यवसाय चालू राहील. परंतु दिवसेंदिवस तेथे राहाणे हे अशक्य होऊ लागले तेव्हा मात्र त्यांच्या मुसलमान मित्रांनी आणि स्नेह्यांनी हात जोडून विनंती केली की आता आम्ही सुद्धा तुम्हाला फार काळ वाचवू शकणार नाही. अब आप यहाँ से जाईये. शेवट नाईलाजाने त्यांनी कराचीतील आपली सर्व मालमत्ता विकली परंतु त्यांच्या हाती रुपयाला दोन आणे (१२.५%) एवढेच मिळू शकले. ते स्वीकारून जीव वाचविण्यासाठी त्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने जानेवारी १९४८ मध्ये कराची सोडली आणि मुंबईत परत आले.

दुसरा कालखंड – १९४८ ते १९६१
कराचीमध्ये सर्वस्व गमावलेले असल्याने आता अप्पासाहेबांना पुन्हा नव्याने साऱ्या गोष्टींची जुळवणी करणे क्रमप्राप्त होते. त्यांचे एक नातलग, नारायणराव पटवर्धन आणि स्नेही, चिमणभाई गांधी यांच्याबरोबर भागीदारीत मुंबईतील लोहार चाळीमध्ये व्ही. रमेश अँड कंपनी नावाने हार्डवेअर अँड टुल्सचे दुकान १९४९-५० साली सुरु केले. पण त्यांचा खरा इंटरेस्ट इंजिनिअरिंग क्षेत्रातील साहित्य पुरवण्याचा होता पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या भागीदारांना असा धंदा वाढवण्याचा उत्साह नाहीये तेव्हा मग त्यांनी सचिन अँड कंपनीची स्थापना १९५३ साली केली. जरी ते त्यांच्या भागीदारांपासून वेगळे झाले असले तरी त्या दोघांनी सुरुवातीच्या काळात केलेली मदत ते विसरले नव्हते म्हणून स्वतःच्या कंपनीचे नाव त्यांनी एकत्र कॉइन केले (स – सखाराम, चि – चिमणभाई आणि न – नारायण). सरकारी टेंडर मार्फत वेगवेगळ्या खात्यांना लागणारे इंजिनिअरिंग क्षेत्रातले साहित्य पुरवठा करण्याचे काम या कंपनीद्वारे सुरु केले. अल्पकाळात Approved Government Supplier म्हणून ते नावारुपाला आले. धंदा वाढवायचा असल्याने कुठल्याही ऑर्डरला नाही म्हणायचे नाही हे तर ठरलेलंच होतं त्यामुळे अगदी पोलीस खात्याला फेल्ट वॉटर बॉटल्स पुरवण्यापासून काहीही करायची तयारी होती. त्यावेळचा काळच वेगळा असेल किंवा अप्पासाहेबांचे सचोटीने धंदा करणे हे ब्रीद असल्यामुळे की काय पण कधीही लाच द्यायची वेळ आली नाही. जहाजाला लागणाऱ्या लाईट्सचे ते त्याकाळी एकमेव उत्पादक होते.
त्यांच्याकडे काम करत असलेल्या सुमनभाई दोशी यांचा धाकटा भाऊ, किर्तीकुमार हा BCom करत होता. त्याला ते सांगायचे शिक्षणाबरोबर काम करायला लाग. चल, माझे Accounts तू लिही. Auditor कडे जा. नंतर ते CA झाल्यावर त्यांच्याकडेच ऑडिटचे काम सोपवले आणि तेच किर्तीभाई आमचे आजही ऑडिटर आहेत.

कालांतराने जेव्हा टेल्को आणि प्रीमियर ऑटो यांच्या मागण्या येऊ लागल्या तेव्हा त्यांनी स्वतःचे वर्कशॉप सचिन इंजिनीरिंग कॉर्पोरेशन या नावाने सुरु करण्याचा निर्णय १९५८ साली घेतला. आणि सुमनभाई दोशी यांना सचिन अँड कंपनीचा व्यवसाय ट्रान्सफर केला. आजही त्या कंपनीचा व्यवसाय २५, बँक स्ट्रीट याच ओरिजिनल पत्यावर सुरु आहे.
पैशाचे पाठबळ त्यांच्याकडे नव्हतंच त्यामुळे कर्ज काढल्याशिवाय ते शक्यच नव्हतं. तेव्हा ते सारस्वत बँकेच्या हमाम स्ट्रीट शाखेकडे त्यांनी अर्ज केला. त्यावेळी सारस्वत बँक ही मुख्यत्वे करून सोने तारण ठेऊन कर्ज देणे येवढंच करत असे. त्या शाखेतील आर के पंडित यांना मात्र असं लक्षात येत होतं की इंडस्ट्रीला कर्ज वितरण केल्याशिवाय बँक मोठी होणार नाही. त्यांनी बँकेच्या बोर्डाला ते पटवून दिलं आणि सचिन इंजिनीरिंग ही पहिल्या काही कर्जदारांपैकी एक होती.

हे वर्कशॉप सुरुवातीला सिद्धिविनायक देवळाच्या बाहेर एका गाळ्यात होते आणि मग जागा कमी पडू लागली म्हणून ते बांद्रा तलावाच्या जवळ, नंदी सिनेमाच्या बाजूला जरा मोठ्या जागेत १९६० साली हलवले. कराचीतील अनुभवामुळे असेल पण त्यांना मुस्लिम कारागिरांचे कौशल्य त्यांना माहिती होते  आणि त्यामुळे त्यांच्याकडील एक-दोन विभागात संपूर्णपणे मुस्लिम कामगार होते. टेल्को, प्रीमियर या कंपन्यांबरोबरच ते फिलिप्सला रेडियो पार्ट्स सप्लाय करू लागले. १९५५ मध्ये त्यांनी स्विफ्टस लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. त्यांचे एक स्नेही आणि मित्र, पी एन (बाबुराव) पटवर्धन, जे एअर इंडिया मध्ये होते, त्यांच्या मदतीने एअर इंडियाला लागणारी टूल्स ते देऊ लागले. त्याकरता त्यांनी Gedore या जर्मन कंपनीची एजेन्सी घेतली. तसेच एअर इंडियाला चहा कॉफी साठी लागणारे स्टेनलेस स्टीलचे jugs पण ते बनवत असत. तसेच रॅलीज इंडिया लिमिटेड या कंपनीची एजन्सी घेऊन त्यांनी आपला उद्योगविस्तार सुरुच ठेवला. रॅलीज कंपनीचे फॅन्स व वुल्फ (Wolf) ब्रँड इलेक्ट्रिक हँड टूल्स त्या जमान्यात खूप लोकप्रिय होती. एअर इंडिया आणि रॅलीज या कंपन्यांची कामे साधारण १९६०-६१ पर्यंत चालू होती. नंतर अप्पासाहेबांनी Gestetner च्या Stencil Duplicator ला स्वस्त पर्याय म्हणून Spirit Duplicator बनविला पण हे प्रॉडक्ट मार्केट मध्ये खूप यशस्वी होऊ शकले नाही. टेल्कोला लागणारे बॅटरी कनेक्टर्स बनविण्यासाठी त्यांनी अल्फा इलेक्ट्रिकल्स या कंपनीची पण स्थापना केली.

अशा पद्धतीने टेल्को आणि प्रीमियर यांची कामे तर सारखी वाढतच होती त्यामुळे आता बांद्रयाची जागा कमी पडू लागली आणि अप्पासाहेब मोठ्या जागेच्या शोधात होते. एकदा एका मिटींग मध्ये त्यांचा एक स्नेही त्यांना म्हणाला की पोर्तुगीज चर्चची प्रभादेवीत बरीच जागा आहे तेव्हा बघा काही जमतंय का ते. तिथे असलेल्या इतर जणांनी याला वेड्यात काढला की ख्रिश्चन ट्रस्ट एका महाराष्ट्रीय ब्राह्मण माणसाला जागा देणं शक्य आहे का? पण अप्पासाहेबांना वाटलं की चर्चच्या फादरला भेटायला काय हरकत आहे? फार तर काय होईल, नाही म्हणेल.

तिसरा कालखंड – १९६१ आणि पुढे
अप्पासाहेब पोर्तुगीज चर्चच्या फादर वाझ यांना जाऊन भेटले आणि त्यांनी कसे पटवले माहित नाही पण फादरनी चर्चची प्रभादेवीतील जागा एस पी मराठे अँड कंपनीला लीझ वर द्यायचे कबूल केलं. खरं तर ती जागा तशी त्यावेळच्या जंगलातच होती तरी देखील त्या जागेतील अर्ध्या भागात १०० झोपड्या होत्या. तेव्हांही त्या झोपडपट्टीचा एक दादा होता. तो अप्पासाहेबांना म्हणाला की आम्हाला प्रत्येक रु. ५०० द्या, आम्ही शांतपणे निघून जाऊ. पण पैसे आणायचे कुठून हा यक्षप्रश्न होता तेव्हा त्यांना रॅशनल आर्ट प्रेसचे देवकुळे भेटले आणि त्यांनी ते पैसे द्यायची तयारी दाखवली. पण त्यांची अट होती की तो अर्धा प्लॉट त्यांच्या नावाने व्हावा. अप्पासाहेबांनी फादर वाझ यांना ते ही पटवलं आणि अर्धा प्लॉट त्यांना दिला. उरलेल्या अर्ध्या प्लॉटवर एका माणसाचं शेत होतं. जेव्हा त्याला कळलं की बाजूला रु. ५०००० देण्यात आले तेव्हा त्यानेही सांगितलं की मला तेवढेच पैसे द्या तेव्हा परत पंचाईत. तेव्हा थेराप्युटिक फार्मा या कंपनीच्या के.पी. मेनन यांनी ते देण्याची तयारी दर्शविली आणि त्याच्या बदल्यात होणाऱ्या नवीन वास्तूतील काही जागा मागितली. दुसरा काही मार्ग नसल्यामुळे मान्य करण्याशिवाय पर्यायच नव्हता.

परत सारस्वत बँक देखील मदतीला आली आणि १९६४ साली अर्धा भाग आणि १९६६ साली उरलेला अर्धा भाग अशा पद्धतीने मराठे उद्योग भवन ही वास्तू उभी राहिली.
सुरुवातीला त्याचे नाव मराठे इंडस्ट्रियल इस्टेट असे असणार होते पण माझे एक काका पं. वसंत गाडगीळ यांनी अप्पासाहेबांना ते नाव बदलण्यास उद्युक्त केले. वास्तू उदघाटनाला लालचंद हिराचंद आले आणि नंतर गच्चीत भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. साधारण १९६५ पासून अप्पासाहेब तिथेच राहू लागले.
१९६७ साली अप्पासाहेबांचे मित्र, ऑटोमॅटिक इलेक्ट्रिकचे मधुकर भट यांच्या प्रेरणेने आणि आपले स्वतःचे काहीतरी प्रॉडक्ट असावे या संकल्पनेतून ऑफसेट प्रिटिंग मशिन बनविण्याचा विचार झाला. त्यावेळी भारतात कोणीही ऑफसेट मशिन्स बनवत नसे त्यामुळे आपल्या देशातील ती एक मुहूर्तमेढ ठरणार होती. अप्पासाहेबांचा मुलगा सुरेश (माझे वडील) आणि जावई राजाभाऊ केळकर यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पुढील २ वर्षात त्या मशीनचे प्रोटोटाइप पण तयार होत आले. पण २८ ऑगस्ट १९६९ रोजी नियतीचा घाला पडला आणि हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या अवघ्या ५८ व्या वर्षी अप्पासाहेबांचे दुःखद निधन झाले.

या कर्तृत्ववान मराठी उद्योगपतीने कराचीहून हाती भोपळा घेऊन परत आल्यानंतर सुद्धा एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे मुंबईत पुन्हा आपले उद्योगसाम्राज्य उभे केले याचा मराठी उद्योजकांनी ठेवण्यासारखा आदर्श आहे. फाळणीच्या प्रसंगाचा सामना करून भारतात परतलेल्या मराठी उद्योजकांपैकी सर्वच जण अप्पासाहेबांप्रमाणे भारतात उद्योगव्यवसायात पुन्हा ठामपणे उभे राहिले असे घडलेले फारसे माहित नाही. तेथून आलेले अनेक मराठी उद्योजक पुढे स्वतंत्र व्यावसायिक म्हणून फारसे यशस्वी ठरले नाहीत. फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात निर्वासित झालेले सिंधी बांधव हे पुढे जगभर पसरले. उद्यमशील वृत्तीमुळे त्या सिंधींपैकी काही जण पुढे काही वर्षांत कोट्याधीशही बनले. मात्र कराचीतला सर्वसामान्य मराठी माणूस हा फाळणीनंतर मुंबईत येऊनही नोकरीच्या शोधात वणवण फिरत राहिला.

१९७१ सालापर्यंत मराठे उद्योग भवन समोर रस्ताच नव्हता. समोरच्या प्रभादेवी मंदिराच्या गल्लीत गाडी उभी करावी लागे. १९७४ साली सदानंद वर्दे यांच्या प्रयत्नाने आणि शिवसेनेच्या मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांच्या सहकार्यामुळे पुढे होणाऱ्या रस्त्याचे नामकरण अप्पासाहेब मराठे मार्ग असे करण्यात आले.
आज २०१८ साली देखील मराठे उद्योग भवन ही वास्तू दिमाखात उभी आहे. आज ती बिल्डिंग या शहरातील एक Landmark आहे. तसेच अप्पासाहेब मराठे मार्ग हा मुंबईतील एक प्रमुख रस्ता आहे.
अप्पासाहेबांच्या तिसऱ्या पिढीतील मी आणि माझा भाऊ वसंत ही वास्तू जशी होती तशीच सांभाळत आहोत आणि आम्हांला त्याचा सार्थ अभिमान आहे. मुंबईतील किंवा तसे भारतातील सुद्धा किती जण आमच्यासारखा पत्ता सांगू शकतील ?

 

Web Title: Vengurla to Mumbai via Karachi Life Journey of Marathi businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.